Maharashtra Industries Minister : देशभरातील बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे. नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयात युवा उद्योजकांच्या कर्जप्रकरणांचा आढावा घेताना मंत्री सामंत यांनी बँक अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी बँकांच्या कर्जवाटप प्रक्रियेवर टीका करताना त्यांनी, ‘मी जर सांगितलं की माझ्या मित्राकडे 50 कोटींचं कॅश क्रेडिट आहे, तर तुम्ही बँकवाले त्यांच्या बेडरूमपर्यंत जाल,’ असे विधान केल्याचे समोर आले आहे.
नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध सरकारी योजनांअंतर्गत युवा उद्योजकांनी दाखल केलेल्या कर्जप्रकरणांचा उद्योगमंत्री सामंत यांनी आढावा घेतला. अनेक कर्जप्रकरणे प्रलंबित असल्याने तसेच काही प्रकरणे नामंजूर केल्याने त्यांनी बँक (Bank) अधिकाऱ्यांना जाब विचारला.
युवा उद्योजकांना कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याबद्दल मंत्री सामंत (Uday Samant) यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवणे किंवा नामंजूर करण्यामागची कारणे तपासण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. युवा उद्योजकांना हॅरेसमेंट होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फिर्याद का नोंदवू नये?, असा सवालही सामंत यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सांगण्यात आले.
कर्जप्रकरणे नामंजूर करणाऱ्या बँकांची चौकशी करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले. तसेच बेरोजगार युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांमधून उद्योग विभागाचे बँक खाते काढून घेण्याच्या सूचना त्यांनी प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन यांना दिल्या. या बैठकीला आमदार रघुनाथ रघुवंशी तसेच उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 11 सप्टेंबर रोजी देशव्यापी बँक संप पुकारला आहे. पाच दिवसांची बँकिंग व्यवस्था लागू करण्यास होत असलेला विलंब, परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेबाबतचे मतभेद आणि पेन्शनशी संबंधित प्रलंबित प्रश्न हे संघटनांच्या प्रमुख मागण्यांपैकी आहेत.
आजच्या संपाच्या पार्श्वभूमीवरच सामंत यांनी बँक अधिकाऱ्यांवर केलेल्या टीकेमुळे त्यांच्या विधानाची बँकिंग क्षेत्रात चर्चा होण्याची शक्यता आहे. संघटनांकडून या विधानावर काय भूमिका घेतली जाते, याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, मागण्यांवर तोडगा न निघाल्यास 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप पुकारण्याचा इशारा बँक संघटनांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.