Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून जागा वाटपात सहभागी असलेले, विक्रम राठोड तेथून निघत, थेट एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी बोलवलेल्या तातडीच्या प्रेसमध्ये सहभागी झाले.
अनिल शिंदे यांनी भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुती तुटल्याचे सांगताच, विक्रम राठोड यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहोत, असे जाहीर केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या संघटन नेतृत्वावर विक्रम राठोड यांनी घणाघात केला.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्षप्रमुख म्हणत, लवकरच खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याची घोषणा, शिवसेनेचे दिवंगत उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र युवासेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची घोषणा केली आहे. 'खऱ्या शिवसेनेत परत आलो आहे. आमचं चिन्हं, 25 वर्षे धनुष्यबाण होतं, आमच्या वडिलांचं चिन्हं होतं, स्वगृही परत आलो आहे. वडिलांच्या निधनानंतर पक्षाची आम्ही एकनिष्ठ राहिलो. उद्धवसाहेबांबरोबर एकनिष्ठ राहिलो. पण दखल घेतली नाही. वडिल गेल्यानंतर, अहिल्यानगर शहरात राठोड परिवाराचा फक्त वापर केला गेला. ते त्यांच्यापद्धतीने चालत राहिले,' असा घणाघात विक्रम राठोड यांनी केला.
विक्रम राठोड म्हणाले, "विधानसभेला शिवसेनेला (Shivsena) उमेदवारीचं मिळाली पाहिजे होती, पण अहिल्यानगर शहराला तिकीट न देता, ती उमेदवारी श्रीगोंद्याला दिली गेली. तरी देखील आम्ही शांत बसलो." महापालिका निवडणुकीत देखील अनेक गोष्टी घडत आहेत. आम्ही उद्धवसाहेबांकडे गेलो, जबाबदारी मागितली, पण नेमकं काय चाललं आहे, हे समजतच नाही. एक खंबीर नेतृत्व हवं आहे, असे म्हणत, एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्याला संभाळणारं नेतृत्व आहे, असे विक्रम राठोड यांनी म्हटले.
"वडिलांनी पक्षाला 25 वर्षे दिलं. या काळात त्यांना अनेक आमिषं आली. पण त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही. कार्यकर्ता पक्षाशी निष्ठावान राहिला, पण पक्षाने कार्यकर्त्याशी निष्ठा ठेवली नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आठ तारखेला अहिल्यानगर शहर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी त्यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहे," असे विक्रम राठोड यांनी जाहीर केले.
'कुरघोड्या सगळीकडे असतात, पण तिथं संघटना कोणत्या दिशेला चालली आहे, हेच कळत नाही, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या संघटनेच्या कार्यपद्धतीवर लगावला. विशेष म्हणजे, त्यांनी विचार सोडले आहे. पण आम्ही हिंदुत्वावादी विचारांचे आहोत,' असेही विक्रम राठोड यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी, शिर्डीमध्ये एकनाथ शिंदे आले असताना, त्यावेळी विक्रम राठोड यांनी त्यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये चर्चा झाली. त्याचवेळी विक्रम यांचा शिवसेनेत येण्याचा निर्णय झाला होता. भाजप-अजित पवार राष्ट्रवादीशी युती तुटल्याचे समजताच त्यांनी पक्षप्रवेश पुढे होईल, असे सांगून संघटनेत लगेचच सक्रिय झाले, असे सांगितले.
विक्रम राठोड यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा राजीनामा देत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात असल्याचे जाहीर केले आहे. यावर अहिल्यानगर महापालिकेत महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
खासदार लंके म्हणाले, "विक्रम राठोडांवर काही अन्याय झालेला नाही. आता माझ्याबरोबर होते. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून ते वाटाघाटीत सहभागी होते. पाच-दहा मिनिटांत काही झालं असेल, तर मला माहित नाही. राजकारण क्षणात बदलतं." महायुती तुटली आहे. बिघाड झाला आहे. त्याचा फायदा शंभर टक्के महाविकास आघाडीला होईल, असा दावा खासदार लंके यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.