NCP, Shivsena & Congress aagitaion at Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादीसाठी शिवसेना मदतीला आली: मलिक यांच्या समर्थनार्थ आक्रमक आंदोलन!

महाविकास आघाडीच्या रास्ता रोको आंदोलनाने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

Sampat Devgire

नाशिक : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील ‘इडी’ कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही घटक पक्ष एकत्र आले. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रवेशद्वार असलेल्या द्वारका चौकात रास्ता रोको केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी अतिशय आक्रमकपणे द्वारका चौकात भाजप (BJP) आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

द्वारका चौकात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने भाजप आणि केंद्र सरकारने ‘इडी ’ च्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई केली.

भाजप सरकारविरुद्ध आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध इडी चे हत्यार भाजपकडून उपसले जात आहे. श्री. मलिक यांच्या बाबतीतदेखील तेच केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. दादागिरी करून सर्वांची मुस्कटदाबी केली जात आहे. परंतु महाविकास आघाडीचा प्रत्येक पदाधिकारी श्री. मलिक यांच्या पाठीशी आहे आणि राहणार असे आंदोलनाच्या दरम्यान पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विविध प्रकारच्या घोषणा आंदोलनादरम्यान देण्यात आल्या. तिन्ही पक्षांचे सुमारे चारशे ते पाचशे पदाधिकाऱ्यांनी द्वारका चौकात रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

सुमारे एक तास आंदोलन करण्यात आले. घटनेचे गांभीर्य घेता द्वारका चौकात भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. आंदोलनास पोलिसांची परवानगी घेतली असल्याने आंदोलनकर्त्यांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

माजी आमदार पंकज भुजबळ, दिलीप खैरे, वत्सला खैरे, शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, नगरसेविका समिना मेमन, नाना पवार, रंजना पवार, हनीफ बशीर, कविता कर्डक, अनिता भामरे, सचिन बांडे, आर. डी. धोंगडे, अजीम सय्यद, संदीप डहाके, नाना काळे, योगेश गाडेकर, राहुल ताजनपुरे, सुनील जाधव, फातिमा रंगरेज आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT