नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena) आमदार फोडल्यावर सावध झालेल्या नेत्यांनी नाशिक शहरात (Nashik) शिवसेना इनटॅक्ट ठेवली होती. कोणीही पदाधिकारी शिंदे गटात गेला नव्हता. काल माजी नगरसेवक प्रविण तिदमे (Pravin Tidme) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर स्थानिक नेते अलर्ट झाले. त्यांनी माजी नगरसेवकांशी संपर्क, चर्चा तसेच थेट घरी जाऊन भेटी गाठी सुरु केल्या आहेत. यामध्ये शिवसेनेती एकोपा प्रकर्षाने पुढे आला. (Shivsena leaders shown unity and coordination in party in Nashik)
नाशिकमध्ये शिवसेनेचे खनिकर्म मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे या शिंदे गटाच्या नेत्यांना आपला प्रभाव दाखविण्यासाठी शिवसेनेत तोडफोड करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याला अटकाव घालण्यासाठी सेनेचे शहरातील पदाधिकारी माजी नगरसेवकांच्या दारापर्यंत पोचून संभाव्य बंडखोरी परतून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, वसंत गिते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी गटनेते विलास शिंदे यांनी बुधवारी (ता. २१) नाशिक रोड भागाचा दौरा करून १२ माजी नगरसेवकांची भेट घेतली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेनेची बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापन करताना शिवसेना संघटनेलादेखील भगदाड पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. विद्यमान खनिज मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जात शिंदे गटाला साथ दिली. मात्र, शिंदे गटाचा प्रभाव शहरी भागात फारसा दिसत नव्हता. नेते उद्धव ठाकरे की शिंदे गट, अशी चर्चा करत असले तरी कार्यकर्ता मात्र जागेचा हल्ला नाही आजही तीच परिस्थिती आहे.
मात्र, मंगळवारी मुन्सिपल कामगार सेनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण यांनी अचानक शिंदे गटात सहभागी होत महानगरप्रमुख पद पदरात पाडून घेतले. नाशिक शहरात आत्तापर्यंत भक्कम वाटणारी शिवसेना तिदमे यांच्या प्रवेशाने डळमळीत झाल्याचे पाहायला मिळाले. तिदमे कर्मचारी कामगारांचे नेतृत्व करत असले तरी एका आवाजावर संघटनेचे सभासद एकत्र येतील एवढी ताकद नाही. त्यामुळे तिदमे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने शिवसेनेचे फार मोठे नुकसान झाले. असेही नाही मात्र माजी नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संभाव्य बंडखोरी परतावून लावण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन गप्पा मारल्या जात आहे.
मनोमिलन, गप्पा व चहापान
नाशिक रोड भागात सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी १२ माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. एकमेकांच्या सुख, दुःखाची चर्चा करताना अडचणीच्या काळात पक्ष सोडू नये. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.
शिष्टमंडळासह माजी नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी आम्ही शिवसेनेतच आहोत व शिवसेनेतच राहणार, अशी ग्वाही देण्यात आली. अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगण्यात आले.
- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख शिवसेना.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.