MLA Amol Khatal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangamner school news : 'विद्यार्थ्यांना पाढे येत नाहीत, शिक्षक काय शिकवतात?' आमदार खताळ शाळेत पोहोचताच भडकले!

MLA Amol Khatal surprise visit ZP school in Sangamner exposed gaps in students basic maths skills, prompting questions to teachers : चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठ आणि नऊचे पाढे सांगता न आल्याने आमदार अमोल खताळ संतापले; मुख्याध्यापकांसह शिक्षकांना विचारला जाब, अध्यापनात सुधारणा करण्याच्या सूचना.

Pradeep Pendhare

Maharashtra education news : संगमनेर तालुक्यातील पठारभागातील हिवरगाव पठार अंतर्गत येणाऱ्या गिऱ्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आमदार अमोल खताळ यांनी अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची चाचपणी केली.

चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठ आणि नऊचे पाढे विचारले असता काही विद्यार्थ्यांना ते सांगता आले नाहीत. विद्यार्थ्यांची ही स्थिती पाहून खताळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'विद्यार्थ्यांना पाढे येत नसतील, तर शाळेत शिक्षक नेमके काय शिकवतात?' असा थेट सवाल त्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना केला.

आमदार खताळ शाळेत दाखल होताच शिक्षक आणि मुख्याध्यापकांची धावपळ उडाली. त्यांनी थेट वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी (Student) संवाद साधला. गणिताचे पाढे विचारून विद्यार्थ्यांच्या मूलभूत ज्ञानाची तपासणी केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी पाढे व्यवस्थित सांगितले; मात्र चौथी-पाचवीच्या काही विद्यार्थ्यांना आठ आणि नऊचे पाढेही सांगता आले नाहीत. या प्रकारावर नाराजी व्यक्त करत त्यांनी शिक्षकांना जाब विचारला.

शिक्षकांना (Teacher) शासनाकडून नियमित वेतन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, त्यांचे मूलभूत ज्ञान पक्के करणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक गणिताचे ज्ञानही अवगत नसेल, तर अध्यापनाच्या पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांनी अधिक गांभीर्याने आणि जबाबदारीने अध्यापन करावे. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर आवश्यक असलेले मूलभूत ज्ञान अवगत होईल, यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, आमदारांच्या या अचानक भेटीमुळे गिऱ्हेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अध्यापनाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी टँकरद्वारे पाणी

संगमनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, शासकीय यंत्रणेमार्फत टँकर सुरू होण्याची वाट न पाहता नागरिकांना तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिवसेना आणि महायुतीच्यावतीने गावांमधील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार खासगी पाण्याचे टँकरही सुरू करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही आमदार खताळ यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT