Vikhe Patil Vs Shivsena: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे अतिशय प्रगल्भ नेतृत्व होते. अनेक मुख्यमंत्र्यांना जमले नाही, ते कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे काम त्यांनी करून दाखवले. ही त्यांच्या नेतृत्वाची चुणूक होती, असे राज्याचे महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक आज दिंडोरी येथे झाली. यानिमित्त महसूलमंत्री विखे पाटील नाशिकला आले होते. या वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला.
विखे पाटील यांनी मनोहर जोशी यांच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी कृषिमंत्री म्हणून काम केले होते. त्यांना खरे तर सिंचनाविषयी फारसा अनुभव नव्हता. मात्र, त्यांनी कृष्णा खोऱ्यातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा केला. धरण कसे असतील, पुनर्वसन, नवे प्रकल्प, सिंचनाची व्यवस्था याबाबत त्यांनी अतिशय बारीक-सारीक तपशील व माहिती जमा केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यापूर्वी अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्ष आणि नेत्यांना जे जमले नाही, ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचा प्रश्न त्यांनी सोडवला. या निमित्ताने दोन-तीन वेळा मी त्यांच्या समवेत दौरेदेखील केले होते. कृष्णा खोरे प्रकल्पामुळे झालेल्या सिंचनातून आज जी संपन्नता आलेली आहे, त्याचे श्रेय खऱ्या अर्थाने मनोहर जोशी यांनाच जाते.
त्यावेळी शिवसेनेच्या निष्ठावंतांना जो सन्मान होता, तो आता दिसत नाही अशी खंत विखे पाटील यांनी व्यक्त केली. स्वतः मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदावर तसेच पक्ष संघटनेत काम करताना अनेक मान अपमान आपल्या मनामध्ये सामावून घेतले होते. आज शिवसेनेमध्ये अशा निष्ठावंत नेत्यांना काहीच किंमत राहिलेली नाही. ज्यांनी हाडाची काडे केली, घामातून शिवसेना उभी केली. ते आज कुठे आहेत?. त्यांना शिवसेनेत काय किंमत आहे?. सध्या तर केवळ सुपारी बहाद्दरांना शिवसेनेत महत्त्व आले आहे. त्यामुळे ती शिवसेना आता राहिली कुठे?. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
Edited By : Rashmi Mane
R