Nashik Vasant Gite
Nashik Vasant Gite Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Politics : वसंत गितेंची नाशिक मध्य मतदारसंघातील दावेदारी झाली मजबूत !

संपत देवगिरे ः सरकारनामा

Nashik News : नाशिकची मल्टीस्टेट नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (नामको) निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांच्या पॅनलला दणदणीत विजय मिळाला. यानिमित्ताने शहरातील नाशिक मध्य विधानसभा मतदार संघावरील त्यांची दावेदारी मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.

‘नामको’ बँकेच्या निवडणुकीत वसंत गीते आणि सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. प्रामुख्याने शहरातील व्यापारी, नोकरदार आणि सर्व घटकांतील सभासदांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नामको’ बँकेच्या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व होते. यामध्ये गीते यांनी बाजी मारली. शिवसेनेचे माजी आमदार गीते हे नाशिक मध्य मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

‘नामको’ बँकेच्या निवडणुकीत त्यांना सभासदांचा मिळालेला पाठिंबा पाहता, त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे शहरातील राजकीय नेते पहात होते. त्यामुळे गीते आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीचा निकाल पाहता आपला दावा गंभीर असल्याचे सिद्ध केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निवडणुकीत माजी आमदार गीते आणि भंडारी यांच्या पॅनलने सर्व राजकीय पक्ष आणि समाज घटकांच्या उमेदवारांची मोट बांधली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी त्यांच्या विरोधात पॅनल उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र उमेदवार न मिळाल्याने ऐनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली. गीते यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी देखील पडद्यामागून गीते यांच्या विरोधात काही इच्छुकांना ताकद देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे, मात्र त्यांचे ते डावपेच देखील यशस्वी होऊ शकले नाही.

माजी आमदार गीते यांच्या प्रगती पॅनलला शिवसेना ठाकरे गट, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा सहभाग होता. त्यामुळे शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे समर्थक या पॅनलच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. या निमित्ताने विधानसभा निवडणुकीतील एक प्रबळ उमेदवार म्हणून गेले काही दिवस आमदार गीते यांचे प्रयत्न आणि तयारी सुरू आहे, त्याला बळ मिळाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT