Solapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या चार शिलेदारांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या दिवशी होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडून या चौघांना धाडण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या महत्वाच्या ठरणार आहेत. (Appointment of four members of Eknath Shinde group to Solapur District Planning Committee)
शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले आहे. राज्याप्रमाणे जिल्ह्याजिल्ह्यांतील सत्तेची पुनर्रचना झाली असून जिल्हा नियोजन समितीवरही महायुतीमधील तीनही पक्षांना संधी मिळाली आहे. गेल्याच आठवड्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा नेत्यांची डीपीसीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या चौघांना नेमण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकनाथ शिंदे गटाचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, महेश साठे, चरणराज चवरे, महेश चिवटे यांना सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर संधी देण्यात आली आहे. या चौघांना गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून निमंत्रित करण्यात आले आहे, याबाबतची माहिती जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी दिली.
शिंदे गटाने सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना संधी देऊन सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. या समितीच्या माध्यमातून शिंदे गटाला आपल्या कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी उपयोग होणार आहे. या सत्तेच्या पदाच्या माध्यमातून या चौघांना आपापल्या भागातील महत्वाचे प्रश्न सोडविण्याची संधी प्राप्त झाली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेला या सत्तेच्या पदाच्या माध्यमातून पक्षसंघटना बळकट करण्याची नामी संधी साधून आली आहे. आता त्याचा फायदा कसा उचलायचा, हे या कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. शहरातील कार्यकर्त्यांना संधी मिळाल्याने सोलापूरमध्येही पक्ष विस्तारासाठी पाठबळ मिळणार आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झालेले चौघेही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क असणारे आहेत. या नियुक्तीमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गटाचे अस्तिव दिसत नाही, त्यामुळे नियोजन समितीपासून सावंत गट चार हात दूर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात सावंत गटातील काहींना नियोजन समितीवर संधी मिळते का, हे पाहावे लागणार आहे.
नियोजन समितीवर खासदार, आमदार हे शासकीय सदस्य असतात. त्याशिवाय अशासकीय सदस्य म्हणून कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात येते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतील चौघांना संधी देण्यात आली आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.