EVM Hacking fraud Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Assembly Election: धक्कादायक; ‘42 लाख द्या, ईव्हीएम मशीनने तुम्हाला विजयी करतो’

Vasant Gite's complaint of threat to hack EVM Machine: आयटी फ्रॉड आता उमेदवारी देण्यापासून तर निवडणुकीत मतदान यंत्र हॅक करण्यापर्यंत पोहोचले.

Sampat Devgire

Vasant Gite News: आयटी फ्रॉड सर्वसामान्यांना हैराण करीत आहे. ते पोलिसांच्या कारवाई पलीकडे पोहोचले आहे. आता ही फसवणूक विधानसभा निवडणुकीतही पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या एका उमेदवाराला हा अनुभव आला आहे.

नाशिक शहरात बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत गीते यांच्या कार्यकर्त्यांना अशाच एका धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. त्यांच्या कार्यालयात आलेल्या एका उत्तर भारतीय व्यक्तीने विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्र सेटिंग करणारे सर्व लोक माझे आहेत, असे सांगून खळबळ उडवून दिली.

तुम्हाला ही निवडणूक जिंकायची असल्यास 42 लाख रुपये द्या. होणाऱ्या मतदानात 30 ते 40 टक्के मतदान तुम्हाला होईल, अशी व्यवस्था करून देतो. तुम्ही पैसे न दिल्यास तुमचा पराभव करण्याची व्यवस्था मी करू शकतो, असे सांगत धमकावले. हे ऐकल्यानंतर तेथील कार्यकर्ते अस्वस्थ झाले.

त्यानंतर त्यांनी याबाबत आपण काहीही करू शकत नाही, असे सांगत पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांना धमकावत तो निघून गेला. हा प्रकार कळल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार केली.

प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनीही त्याची दखल घेत वरिष्ठांना कळविले पोलीस आयुक्तांनी संबंधित प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती व्यक्ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तसेच बोगस आणि निनावी फोन कॉल द्वारे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. ही फसवणूक पोलिसांच्या कार्यक्षेत्र बाहेर असल्याने हे फसवणूक करणारे पोलिसांच्या हाती लागतात त्यासाठी पोलिसांना प्रचंड धावपळ करावी लागते.

आता हा प्रकार उमेदवारी देण्यापासून तर मतदानाचे यंत्र हॅक करण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याने निवडणुकी यंत्रणाही त्यापासून अलिप्त राहिलेली नाही की काय, अशी स्थिती आहे. अशा प्रकारांचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे पोलिसांनी याबाबत गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी याबाबत एक पथक तयार करून संबंधितांचा शोध सुरू केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी उमेदवारांकडे 50 लाख रुपयांची मागणी करण्याचा प्रकार नाशिक शहरात घडला होता. नाशिक शहरात भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत. त्यांना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाशी संबंधित आहोत.

भाजपची उमेदवारी हवी असल्यास 50 लाख रुपये द्या, अशी मागणी त्यांनी केली होती. याबाबत तक्रार केल्यावर सूत्रे हल्ली त्यात सर्वेश मिश्रा उर्फ दिनू सुरेंद्र मिश्रा आणि गौरव बहादुर सिंग नाथ या दोघांना दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले. सध्या ते तिहार तुरुंगात आहेत.

मात्र निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. असे असताना संबंधित घोटाळे आणि आयटी फ्रॉड पैसे कमाविण्यासाठी थेट ईव्हीएम मशीन पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक आणि निवडणुकीची विश्वासार्हता दोन्हीही अडचणीत येऊ पाहत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT