Government guesthouse Dhule : धुळे इथल्या विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये दोन कोटी रुपये सापडतात, यात आता फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. पण ही खोली क्रमांक 102 राज्यातील राजकारणात अन् प्रशासनात 'सिम्बॉल' ठरली आहे.
ही खोली पाहण्याचा मोह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांना देखील आवरला नाही. या खोलीची पाहणी केल्यानंतर रोकडप्रकरणी विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.
धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 हे नाव आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकीय, प्रशासकीय अन् सामाजिक वर्तुळात एक 'सिम्बॉलिक' ठिकाण बनलं आहे. अंदाज समितीच्या दौऱ्यात सापडलेली 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आणि त्याभोवती फिरणारे संशयाचे वादळ, हा केवळ धनसाठा नव्हे, तर लोकशाही संस्थांवरील विश्वासाच्या रेषाच धूसर करणारी घटना आहे, असा घणाघात खासदार राऊत यांनी खोली पाहताना केला.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "विधानमंडळाच्या समित्यांचा उद्देश हा सार्वजनिक धनवापराची पारदर्शकता तपासणी करणे असा आहे. मात्र, याच समितीच्या सान्निध्यात आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या नावाने आरक्षित असलेल्या खोलीत, अशी प्रचंड रोकड सापडणे, हे प्रशासनासाठीच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेसाठी एक धोक्याची घंटा आहे". शिवाय, माजी आमदार अनिल गोटे यांचा ठिय्या, त्यातून उठलेले राजकीय आरोप आणि त्यावर समिती अध्यक्षांचा बचावात्मक प्रतिसाद हे सर्व प्रकरण केवळ चौकशीपुरते मर्यादित राहात नाही, तर एक सत्तासंस्थांवरील नैतिक प्रश्न उपस्थित करते, असे खासदार राऊत यांनी म्हटले.
शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कामराज निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी तत्परता दाखविली. तिच तत्परता विश्रामगृहात सापडलेल्या पैशांच्या प्रकरणात का दाखविली गेली नाही? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
निकम यांनी भाजपसह शिंदखेडा तालुक्यातील नेत्यांची साथ सोडली. त्यानंतर सुडाच्या राजकारणातून निकम यांच्यावर बनावट गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडण्यात आले. विश्रामगृहात सापडलेल्या पैशांबाबत किती जणांना अटक केली. तपासासाठी जाहीर SITचे अधिकार काय? तिची कालमर्यादा किती? हे काहीही सांगितले जात नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल करताना साक्षीदार असलेले अनिल गोटे आणि पैसे देणाऱ्या ठेकेदारांना चौकशीकामी का बोलावले गेले नाही? हे प्रकरण सरकार दडपण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आहेत. यापूर्वी खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांची 'ईडी'कडून चौकशी देखील झाली आहे. अशी पार्श्वभूमी असतानाही त्यांना महत्वाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष का केले? असा प्रश्नही खासदार राऊत यांनी केला.
मुंबईतील विकास कामांच्या नव्याने निविदा काढण्यासाठी संबंधीत कंपनीकडून मंत्र्यास तीन हजार कोटी, तर भारतीय जनता पक्षाला साडेसहाशे कोटी रूपये मिळाले आहेत. त्यातून 40 आमदारांची खरेदी करून सत्ता स्थापन झाली आहे, असा दावा करत मूळ मराठी असलेले सरन्यायाधीश भूषण गवई यांचा योग्य पध्दतीने सन्मान झालाच पाहिजे होता. सरकारी यंत्रणा त्याबाबत चुकली आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.