Mid day meal scheme Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धक्कादायक... आमदारांनी बाजू घेतलेल्या संस्थेनेच हडप केला गरीब मुलांचा तांदूळ?

फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी बचतगटांचा दबाव वाढला.

Sampat Devgire

नाशिक : ज्या संस्थेची तीन कोटींची बीले अदा केली जावीत म्हणून शालेय शिक्षण मंत्र्यांनी (Education Minister) मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी बाजू घेतली, त्या स्वामी विवेकानंद महिला स्वयंसहायता बचतगटाच्या (Self help group) गोडाऊनमध्ये शासनाचा तांदूळ आढळला आहे. महापालिका (NMC) शिक्षण अधिकाऱ्याच्या अहवालात त्याचा उल्लेख झाला. त्यामुळे हडप केलेला तांदूळ व ठेकेदार दोन्ही चर्चेत आले आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार का, याची उत्सुकता आहे.

किचनची स्वच्छता तपासण्यासाठी गुरुवारी शहरात पथक दाखल झाले. यावेळी अंबड येथील आवजीनाथ संस्थेच्या किचन तपासणीत बचतगटाच्या महिलांनी पंचवटीतील गुंजाळ नगर येथे स्वामी विवेकानंद महिला स्वयंसहायता बचतगटाच्या गोडाऊनला भेट देण्याची मागणी केली. या अधिकाऱ्यांना तेथे घेऊन गेले. तेव्हा तेथे एका बंगल्यात शालेय पोषण आहारातील तांदूळ दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. त्यात चौदा हजार किलो वजनाचे २८१ पोती तांदूळ आढळला. त्या प्रकरणी विवेकानंद बचतगटाचे ह्णषिकेश चौधरी यांच्यासह बचतगटांचे जबाब नोंदविले.

या प्रकरणात चौधरी यांनी साठविलेला तांदूळ आपलाच असल्याची कबुली आयुक्त कैलास जाधव यांना सादर केलेल्या अहवालात देण्यात आल्याचा दावा केला जातो. शासन स्तरावरील पोषण आहार योजनेचे राज्य समन्वय अधिकारी देवीदास कुळाल, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, पोषण आहार योजनेचे लेखाधिकारी श्रीधर देवरे, शालेय पोषण आहार योजनेचे अधिक्षक प्रशांत गायकवाड यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेतंर्गत शिजविलेले अन्नपुरवठा करण्यासाठी १३ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली होती. या ठेकेदारांचे सुमारे तीन कोटींचे देयके मिळावे म्हणून शालेय शिक्षण मंत्र्यांनी मध्यस्ती केल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी या ठेकेदारांसाठी पत्रकबाजी केली होती. ती पत्रकबाजी ठेकेदारांचे चांगभलं करणारी ठरली. आता चार सदस्यांची समिती नियुक्त करून सुनावणीचे सोपस्कार पार पडले आहेत. त्यात २८१ पोती तांदूळ दडवून ठेवलेल्या या संस्थेवर काय कारवाई होते याची उत्सुकता आहे.

शालेय पोषण आहाराचा तांदूळ दडवून ठेवल्याने गुन्हा दाखल करावा. महिला बचतगटाच्या माध्यमातूनच काम द्यावे ही शिवसेनेची जुनी मागणी आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन करू.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT