Shrirampur Band Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrirampur Band : श्रीरामपूर हत्याकांडानंतर संताप; बंद दुसऱ्या दिवशीही कायम, 'बेग टोळी'वर मकोका लावा, आमदार ओगले कडाडले

Hemant Ogale seeks MCOCA action as Shrirampur bandh continues after Akash Dubey murder : आकाश दुबय्या हत्या प्रकरणानंतर सर्वपक्षीय आंदोलन तीव्र; आमदार हेमंत ओगले यांचा गुन्हेगारीवर आरोप, मंगळवारी बंद तर बुधवारी मोर्चाचे आयोजन.

Pradeep Pendhare

Shrirampur Latest News : हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या सर्वपक्षीय बेमुदत बंदला सोमवारी दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या आंदोलनादरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत, 'बेग टोळी' म्हणून उल्लेख केलेल्या गुन्हेगारी गटाविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.

श्रीरामपूरातील (Shrirampur) आकाश दुबय्या हत्या प्रकरणानंतर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पक्ष, व्यापारी संघटना आणि नागरिक एकत्र आले आहेत. रविवारी मृतदेहासह पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारीही शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. दुपारी झालेल्या बैठकीत मंगळवारीही बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बुधवारी (15 जुलै) सकाळी रेल्वे स्थानकासमोरील हनुमान मंदिरापासून शहरातून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

माध्यमांशी बोलताना आमदार ओगले यांनी प्रशासन आणि पोलिसांना (Police) शहरातील संबंधित गुन्हेगारी टोळीची माहिती असल्याचा दावा केला. या टोळीमुळे व्यापारी, डॉक्टर, व्यावसायिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधितांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली.

आमदार ओगले यांनी शहरात ड्रग्ज, गुंगीच्या गोळ्या, अवैध जुगार आणि वाळू व्यवसायासारख्या बेकायदा कारवायांमुळे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही केला. आकाश दुबय्या हत्या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचे सांगत नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन केले आहे. मात्र, मुख्य आरोपींवर मकोका लागू करणे आणि त्यांची तडीपारी करणे, या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम आहेत.

दरम्यान, गावातील शांतता बिघडविणाऱ्या गुंडांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत बेलापूर ग्रामस्थांनी बेलापूर पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. तसेच मंगळवारी बेलापूर गाव बंद ठेवण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT