Police firing Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Police firing : श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीचा थरार! जमावाचा पोलिसांवर कोयत्याने हल्ला, प्रत्युत्तरासाठी थेट गोळीबार!

Shrirampur: Police Fire in Self-Defence After Criminal Mob Attack : पुण्याच्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पथकावर श्रीरामपूर इथं 30 ते 40 जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला.

Pradeep Pendhare

Shrirampur violence news : पुण्याच्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पथक श्रीरामपूरमध्ये एका आरोपीला पकडण्यासाठी आले असता, त्यांच्यावर 30 ते 40 जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला. श्रीरामपूरच्या इराणी गल्ली इथं ही धक्कादायक घटना घडली.

या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कोयत्याचा वार झाला. यात तो गंभीर जखमी झाला असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून उपनिरीक्षकाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. जमावाच्या हल्ल्यानंतर देखील पोलिसांनी धाडसाने मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आयद बाबुलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, वार्ड नं.1, श्रीरामपूर) हा श्रीरामपूरच्या (Shrirampur) इराणी गल्लीत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, फिर्यादी पोलिस हवालदार अजय सरजिने आणि सहकाऱ्यांनी स्थानिक श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने बुधवारी दुपारीच्या सुमारास आरोपीच्या घरावर छापा टाकला.

​पोलिस (Police) आल्याचे समजताच आरोपी आयद सय्यद याने मागच्या दारातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस हवालदार किरण मदने यांनी पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी आरोपीने आरडाओरडा करत गल्लीतील 30 ते 40 लोकांचा जमाव जमवला. "पत्थर फेको इन सालों पे, कुछ नही होगा" असे म्हणत त्याने जमावाला पोलिसांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिली. 5 ते 7 अनोळखी व्यक्तींनी पोलिसांशी झटापट करून आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला.

आरोपीच्या चिथावणीनंतर 'झेरू' नावाच्या एका तरुणाने हातात कोयता घेऊन पोलिसांवर हल्ला चढवला. त्याने पोलिस हवालदार मदने यांच्या डोक्यावर वार केला. परंतु मदने यांनी तो वार हाताने अडवल्यामुळे त्यांच्या मनगटावर गंभीर जखम झाली. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मदने यांना बाजूला सारून जमाव पोलिसांच्या अंगावर धावून आला.

जमाव हिंसक झाल्याने आणि पोलिसांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने, उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी तात्काळ निर्णय घेत आपल्या पिस्तुलातून गोळीबार केला. हवेत एक राऊंड फायर केल्याने जमावाची पांगापांग झाली. त्यानंतर अतिरिक्त पोलिस कुमक मागवून आरोपी आयद सय्यद याला पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. ​

याप्रकरणी हवालदार अजय सरजिने यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आयद बाबुलाल सय्यद, झेरू (पूर्ण नाव माहित नाही), महिलांसह इतर 5 ते 7 अनोळखी व्यक्तींविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पोलिस कर्मचारी मदने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे श्रीरामपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT