

Stray Dog Survey Maharashtra : भटक्या श्वान उपद्रवाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर काढलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला. त्यामुळे अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांवर थेट कुत्रे मोजण्याची जबाबदारी टाकली. स्थानिक पातळीवर पत्रे काढल्याने राज्यभर गोंधळ निर्माण झाला असून, या प्रकाराबाबत शिक्षण क्षेत्रातून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुमोटोमध्ये दिलेल्या निकालाच्या आधारावर राज्याच्या मुख्य सचिवांनी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यासाठी जागा निश्चित करणे, आदी अनेक आदेश राज्यातील सर्व विभागाला दिले होते.
त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण (Education) विभागानेही या आदेशाच्या आधारावर भटक्या कुत्र्यांचा शाळांमध्ये प्रवेश रोखणे, शाळांचा परिसर यापासून सुरक्षित करणे, श्वानांचा वावर शाळा परिसरात राहणार नाही.
तसेच उघड्यावर फेकलेल्या खाद्यपदार्थांची योग्य विल्हेवाट लावण्याची खात्री करण्यासाठी नोडल अधिकारी नेमणे, श्वानाचा चावा झाल्यास प्रथमोपचार घेणे आदीसाठी शाळांमध्ये प्रबोधनाचे सत्र आयोजित करणे, आदी सूचना देण्यात आल्या होत्या.
यात कुठेही शिक्षकांनी कुत्र्यांची संख्या मोजण्याची सूचना, अथवा आदेश दिलेले नाहीत. मात्र शिक्षण विभागातील काही कच्चा अभ्यास असलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर शाळा (School) आणि परिसरातील कुत्र्यांची संख्या मोजण्यासाठी कॉलम देत यासाठी नोडल अधिकारीच नेमा, अशा सूचना दिल्या.
या सूचनांमागे असलेल्या मूळ आदेशाची खातरजमा न करता काही उत्साही शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी आम्हाला कुत्रे मोजण्याचे आदेश दिल्याचा दावा करून त्यावर गोंधळ घातल्याचे चित्र राज्यभर निर्माण झाले आहे.
यामुळे मूळ आदेशाचा अर्थ समजून न घेणाऱ्या राज्यातील त्या शिक्षणाधिकाऱ्यांची शालेय शिक्षण विभागाकडून तात्काळ माहिती मागवली जाणार असून संबंधितांवर कारवाई करण्याची तयारीही विभागाकडून करण्यात येणार असल्याचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ महेंद्र गणपुले यांनी, शिक्षण विभागाच्या मूळ परिपत्रकाचा नीट अभ्यास न करता विसंगत आदेश काढल्याने शिक्षण विभागाची बदनामी होत आहे. कोणती काळजी घ्यावी व काय खबरदारी घ्यावी हे सर्वांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. मूळ उद्देश बाजूला राहून भलतेच अर्थ प्रसिद्ध होत आहेत आणि खालच्या स्तरातील अधिकारी भंपकपणामुळे हा प्रकार घडल्याचे दिसते, अशी टिप्पणी केली.
राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी, शाळा परिसरात भटकी कुत्री आढळतात, ती ठिकाणे निश्चित करण्याचे काम स्थानिक महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यालयाने करण्याचे न्यायालयाच्या मूळ आदेशात नमूद आहे. शाळांची स्वच्छता राहावी.
भटकी कुत्रे परिसरात येणार नाहीत, यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करून जबाबदारी निश्चित करणे असे यात अपेक्षित आहे. पण चुकीचा अर्थ निघाल्याने त्यासाठी विभागाने सुधारीत आदेश तात्काळ जारी करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.