SIR voter list Maharashtra : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी अर्थात SIR (Special Intensive Revision) मोहिमेदरम्यान राज्यातील तब्बल 2 कोटी 6 लाख मतदारांची नावे प्रारूप मतदारयाद्यांमधून वगळण्यात आली आहेत.
दुबार नोंदणी, मृत्यू, स्थलांतर किंवा अन्य कारणांमुळे ही नावे वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, संपर्क होऊ न शकल्यामुळे आपले नाव वगळण्यात आल्याच्या तक्रारीही काही मतदारांकडून करण्यात येत आहेत.
अशा परिस्थितीत मतदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. प्रारूप मतदारयादीत (Voter List) नाव नसल्यास ते पुन्हा समाविष्ट करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली आहे. यासाठी मतदारांना फॉर्म 6 भरता येणार आहे. SIR नंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीत आपले नाव आहे की नाही, हे मतदारांनी प्रथम तपासावे. नाव आढळले नाही, तर पात्र मतदार फॉर्म 6 भरून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात.
पूर्वी मतदार (Voter) यादीत नाव असलेल्या, मात्र SIR नंतरच्या प्रारूप यादीत नाव आढळत नसलेल्या मतदारांसाठी हा अर्ज महत्त्वाचा आहे. याशिवाय 18 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनाही मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी फॉर्म 6चा वापर करता येतो. स्थलांतर झालेल्या पात्र नागरिकांनाही नियमानुसार या प्रक्रियेचा लाभ घेता येऊ शकतो.
मतदारांना फॉर्म 6 ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करावे लागू शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल, रेशन कार्ड, बँक पासबुक, अधिकृत भाडेकरार, अलीकडील रंगीत छायाचित्र पुरावा म्हणून जोडावी लागणार आहेत.
फॉर्म 6 सादर केल्यानंतर अर्जाची पडताळणी निवडणूक यंत्रणेकडून केली जाते. आवश्यकतेनुसार बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) मार्फत मतदाराच्या पत्त्याची आणि पात्रतेची पडताळणी केली जाऊ शकते. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया पुढे केली जाते. त्यामुळे SIRच्या प्रारूप मतदारयादीत नाव आढळले नाही, तरी मतदानाचा हक्क गेला असे समजण्याचे कारण नाही. पात्र मतदारांनी प्रथम आपले नाव तपासावे आणि नाव वगळले असल्यास आयोगाने दिलेल्या मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.