

SIR Voter Verification : अहिल्यानगर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीदरम्यान अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका पल्लवी जाधव यांनी आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याची तक्रार करत, अधिकाऱ्यांनी आपल्याला 'मयत' घोषित करून अर्जच भरला नसल्याचा आरोप केला. या प्रकरणाची त्यांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली.
अहिल्यानगर (Ahilyanagar) शहर मतदारसंघातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. बैठकीला आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार ढवळे तसेच नगरसेवक आणि बूथस्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मतदार याद्यांच्या (Voter List) पुनरीक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात विविध तक्रारी मांडण्यात आल्या. कामकाज घाईगडबडीत होत असल्याने मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जात असल्याचा आरोप उपस्थितांनी केला. या प्रक्रियेचे स्वतंत्रपणे क्रॉस-व्हेरिफिकेशन करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी पल्लवी जाधव यांनी आपले नाव मतदार यादीतून वगळल्याबाबत तक्रार मांडली. अधिकाऱ्यांनी आपल्याला 'मयत' दाखवून अर्ज स्वीकारला नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर भाष्य करताना पालकमंत्री विखे पाटील यांनी, "आताच पुनर्जन्म झालेल्या जाधव," असा मिश्कील उल्लेख केला. मात्र, त्यानंतर हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत अशा तक्रारींची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये, यावर भर दिला. काही भागांमध्ये विशिष्ट धर्मीय नागरिकांचे मॅपिंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत त्यांनी अशा प्रकारांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, तसेच धार्मिक स्थळांवर कोणत्याही प्रकारचे मॅपिंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.
याचवेळी आमदार संग्राम जगताप यांनी शहरात मोठ्या प्रमाणात घुसखोर असल्याची माहिती मिळाल्याचा दावा केला. अशा व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी होऊ नये, तसेच बोगस जन्मनोंदींच्या आधारे नावांची नोंद होणार नाही, यासाठी प्रशासन आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीच्या समारोपात मंत्री विखे पाटील यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची मूळ संकल्पना पारदर्शक आणि अचूक मतदार नोंदणीची असल्याचे सांगत, सर्व संबंधितांनी नियमांनुसारच काम करण्याचे निर्देश दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.