Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध कोणाचा? नाथाभाऊंनी सांगितला पुढचा राजकीय प्लॅन...

Vijaykumar Dudhale

Jalgaon, 02 September : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत माझा भाजपत प्रवेश झालेला आहे, त्याचे फोटोही काढलेले आहेत. पण, माझ्या प्रवेशाला काहींनी विरोध केलेला दिसतो आहे, त्यामुळे तो जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत भाजपमध्ये राहणं योग्य नाही, मी लवकरच माझा राजकीय निर्णय घेणार आहे, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याची घोषणा केली होती. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची त्यांनी भेटही घेतली होती. मात्र, अजूनही एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) भाजपमध्ये प्रवेश मिळालेला नाही.

त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर शरद पवार (Sharad Pawar) यांचे फोटो झकळत आहेत, त्यावरून खडसे नेमके कुठे, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपमध्ये प्रवेश करावा, असं माझं मत होतं. भाजप प्रवेशामागं माझी काही कारणं होती. त्याबाबतची मिमांसा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे केली होती. माझ्या काही अडचणी होती, त्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करावा, असं वाटलं होतं, असंही खडसेंनी सांगितले.

तशी विनंती मी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. पण, भाजपकडून काही चांगला प्रतिसाद मिळत नाही. मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाची वाट पाहीन आणि त्यानंतर माझा निर्णय घेईन. राजकीय भवितव्यासाठी मला कुठलातरी निर्णय घेणे आवश्यक आहे. मी हा निर्णय माझ्या वाढदिवशी घेईन, असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

खडसे म्हणाले, मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा मी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. मात्र, त्या दोघांनी माझा राजीनामा अजूनही स्वीकारलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आजही आमदार आहे. आमदारकीचा राजीनामा देण्यास मला शरद पवार यांनी मनाई केलेली आहे. पण मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाच्या निर्णयाची वाट पाहीन. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करेन आणि राष्ट्रवादीचे उत्साहाने काम करेन, असेही खडसेंनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT