Ahmednagar News : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगावमध्ये नवी औद्योगिक वसाहत मंजूर झाली आहे.या औद्योगिक वसाहतीवरून आता राजकारण तापू लागले आहे. कोपरगावमध्ये वसाहती व्हावी,यासाठी पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता असा दावा, भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी केला आहे.विवेक कोल्हे यांचा हा दावा अप्रत्यक्षपणे मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार आशुतोष काळे यांना आव्हान देणारा असल्याची चर्चा आता रंगली आहे.
राहाता आणि कोपरगावमध्ये नवीन वसाहत मंजूर झाल्यानिमित्त महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishana Vikhe) यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. भाजप कार्यकर्ते, समर्थक हे मंत्री विखेंचा जागोजागी सत्कार करत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन वसाहतीसाठी पाठपुरावा केल्याचा लेखाजोखा मांडला आहे.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील लक्ष्मीवाडी मळ्यातील शेती महामंडळाची 203.46 हेक्टेर जमिनीवर नवीन औद्योगिक वसाहतीला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली.
या मंजुरीनंतर भाजपचे युवा नेते तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व विकासासाठी एमआयडीसी सुरू व्हावी यासाठी पाच वर्षांपासून सरकार दरबारी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी दिली.
विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत एमआयडीसी मंजुरीसाठी केलेल्या प्रयत्नांची कागदपत्रांनिशी माहिती दिली. नवीन एमआयडीसी मंजूर केल्याबद्दल विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांचे आभार मानले. काही नेते आता यावर आपले म्हणणे मांडत आहे. परंतु राज्य सरकारकडे करत असलेल्या पाठपुराव्याची शेकडो कागदपत्र माझ्याकडे आहे.
राज्य सरकारशी झालेला पत्रव्यवहार, त्यांनी केलेला पत्रव्यवहार, आम्ही घेतलेल्या भेटी, हे सर्व काही माझ्याकडे आहे. त्यामुळे कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. 502 एकरांपैकी अडीशे एकर कोपरगाव तालुक्यातील आहे. त्यामुळे कोणीही श्रेय घेऊ नये. हे सर्व श्रेय राज्य सरकारचे आहे. गेल्या वेळचे आणि आताचे मंत्री यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू होते. युवक म्हणून अराजकीय व्यासपीठाकडून हा पाठपुरावा सुरू होता, असे विवेक कोल्हे यांनी सांगितले.
नवीन औद्योगिक वसाहत मंजूर व्हावी, यासाठी राज्य सरकारकडे मोठा पाठपुरावा केला. शेतकऱ्याची एकही गुंठा जमीन न घेता औद्योगिक वसाहती निर्माण करा, अशी आमची मागणी होती. शेती महामंडळाची वारी, संवत्सर आणि सोनेवाडी या ठिकाणची जमिनीकडे लक्ष वेधले. पाण्याच्या तुटवड्यामुळे वारी, संवत्सर येथे शक्य झाले. यानंतर 2019 पत्रव्यवहार सुरूच ठेवला. तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. शेती महामंडळाने जागा राज्य सरकारकडे हस्तांतर होणे गरजेचे आहे. यासाठी तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली
उद्योग मंत्रालयाकडे महामंडळाची जागा हस्तांतर करायची असल्याने त्याचा मोबदला गरजेचा आहे. यानंतर तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेतली. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. यानंतर देखील स्मरणपत्र सुरूच ठेवली. औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक वसाहती बाबत पत्र आले. यानंतर औद्योगिक विकास महामंडळाला संपूर्ण कागदपत्रे आम्ही सादर केली. पुन्हा सरकार बदलले आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. यानंतर पुन्हा पाठपुरावा केला. यानंतर पुन्हा कागदपत्रांची पूर्तता केली.
यानंतर नगरचे अधिकारी यांनी पाहणी केली. महसूल विभागाकडे जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव पाठवला. महसूल विभागाने स्वतः एमआयडीसी उभारता येईल का, याची चाचपणी केली. 'एमओयू' देखील विचार केला. परंतु तांत्रिक अडचणी आल्या आणि जागा हस्तांतरणाचा निर्णय झाला. शिर्डी-कोपरगाव एमआयडीसी मंजूर झाली, अशी माहिती विवेक कोल्हे यांनी दिली. ही एमआयडीसी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले.
संवत्सर येथील शेती महामंडळाच्या जमिनीचे उतारे सरकारकडे दिले आहेत. तिथे 'वाॅटर लेस' किंवा 'आयटी-पार्क' सारखी इंडस्ट्री उभी करता येऊ शकते. सरकारकडे शिर्डी, कोपरगाव आणि येवला 'स्काय काॅरिडोर' म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. 'ट्रिपल-टी' शिर्डीला 'ट्युरिझम', येवला 'टेस्ट-टाईल', आणि कोपरगावमध्ये 'टेक्नाेलाॅजी' आहे, या अनुषंगाने विकास करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. संवत्सरची ही फाईल देखील अंतिम टप्प्यात आहे. तिला देखील मंजुरी मिळेल. यातून कोपरगाव हे एक औद्योगिक केंद्र होईल, असा विश्वास विवेक कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.