Ahmednagar Political News : नगर आणि नाशिकमधील धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोपरगावच्या संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल असून, भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यासाठी दिल्लीत संघर्ष करत आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोल्हे यांच्या याचिकेवर मंगळवारी बाजू मांडली. पुढची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे. जायकवाडी पाणी संघर्षात नगरकरांची बाजू कपिल सिब्बल यांच्या एन्ट्रीमुळे निकाल काय येतो, याकडे लक्ष लागले आहे.
जायकवाडीला 8.5 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या आदेशाविरोधात नगर जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी एकजूट दाखवली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात ठराव घेण्यात आला आहे. अकोल्यातून शेतकरी संघटनेने पाणी सोडण्यास विरोध केला आहे.
याशिवाय विखे कारखान्यानेही न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनीही याचिका दाखल केली आहे. याशिवाय नाशिकमधूनही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध सुरू केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, कोपरगाव संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख विवेक कोल्हे यांनी पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध करत थेट दिल्ली गाठली. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेतली. हस्तेक्षप याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशाविरोधात आता सर्व याचिकांवर 12 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या वेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल नगरकरांच्यावतीने बाजू मांडणार असल्याने सुनावणीकडे राज्याचे लक्ष आहे.
विवेक कोल्हे यांनी कपिल सिब्बल यांची भेट घेत विविध मुद्यांवर चर्चा केली. तसेच सुनावणीला उपयुक्त ठरतील, असे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे कपिल सिब्बल यांच्याकडे सुपुर्द केले. समन्यायी पाणी वाटप हा कायदा नगरवर लादला आहे. नगर आणि नाशिकच्या हक्काचे पाणी विभागल्याकडे विवेक कोल्हे यांनी लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयात आजच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील एम. वाय. देशमुख, वरिष्ठ वकील अन्सारी यांच्यासमवेत कोल्हे उपस्थित होते.
तोपर्यंत पाणी सोडू नये..
जायकवाडीला पाणी सोडण्यावरून 'एमडब्ल्यूआरआरए'ने 2016 दिलेल्या सूचना मान्य नसल्याच्या विरोधात संजीवनी उद्योग समूहाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर 2017 मध्ये आदेश झाला. पुन्हा पाणी जायकवाडीला सोडले जाणार असल्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वोच्च न्यायालयात संजीवनीने विशेष याचिका दाखल केली. कालांतराने इतर कारखानेही यात सहभागी झाले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होईपर्यंत सरकारने पाणी सोडण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी सरकारकडे केली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.