Sudhakar Badgujar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sudhakar Badgujar News : सुधाकर बडगुजर यांना अटकपूर्व जामीन मंजूर; दादा भुसेंना धक्का!

Sampat Devgire

Nashik Political News : महापालिकेतील पदाचा दुरुपयोग करून कंत्राट मिळविल्याच्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना बुधवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. हा शिंदे गटाच्या पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो.

सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात बडगुजर यांना यापूर्वी हंगामी जामीन मंजूर झाला होता. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश लोकवाणी यांच्या न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या पत्रावरून बडगुजर यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात बडगुजर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अंतिमता या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात बडगुजर यांच्यावतीने ॲड. एम. वाय. काळे आणि अविनाश भिडे यांनी काम पाहिले. बुधारी सकाळीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बडगुजर शिंदे गट आणि सरकारी यंत्रणांना पुरून उरतील, असा दावा केला होता, तो सायंकाळी खरा ठरला.

याबाबत बडगुजर यांच्यावतीने असे सांगण्यात आले की, महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण गेडाम आणि बडगुजर यांच्यात महापालिकेच्या महासभेत शहराच्या विकासकामांवरून व प्रशासनातील त्रुटी उघड केल्याने वाद झाला होता. या वादाचा राग धरून गेडाम यांनी प्राप्तिकर विभागाकडे व अन्य काही विभागाकडे बडगुजर यांच्याविषयी तक्रार केली होती. त्याची चौकशी होऊन 2016 मध्ये ते प्रकरण बंद करण्यात आले होते. याबाबतचे सर्व पुरावे बडगुजर यांनी संबंधितांना सादर केले होते.

याच पार्श्वभूमीवर तसेच शहरात नुकत्याच घडलेल्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात ठाकरे गटाचे बडगुजर यांनी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासंदर्भात काही राजकीय विधाने केली होती. ललित पाटील प्रकरणावरून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली होती. या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून शासनाच्या विविध यंत्रणांनी गेडाम यांचे जुने प्रकरण उकरले आणि या प्रकरणात नवा गुन्हा दाखल करून बडगुजर यांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता, असेही बोलले जात आहे.

हे पूर्णतः सूडाचे राजकारण असल्याने व त्यात कोणताही पुरावा नसल्याने बडगुजर यांना कायमस्वरूपी अटकपूर्व जामीन मिळावा, अशी बाजू ॲड. एम. वाय. काळे यांनी आणि ॲड. भिडे यांनी मांडली. त्यावर निर्णय होऊन बुधवारी बडगुजर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला.

नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे असलेल्या विविध आक्रमक नेत्यांवर राजकीय दडपण आणून त्यांना अडचणीत आणण्याचे विविध प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे.

यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांत तीव्र स्पर्धा असल्याने सत्ताधारी पक्षाकडून याबाबत सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. एकंदरीतच नाशिक शहराच्या राजकारणात शिवसेनेचे महानगरप्रमुख बडगुजर तूर्त शिंदे गटावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT