Sudhakar Badgujar & Mukesh Shahane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sudhakar Badgujar Politics: ठाकरे गटाचे बडगुजर यांच्या कोंडीसाठी आता भाजपची फिल्डिंग?

Sampat Devgire

BJP Vs Shivsena UBT: नाशिक शहरातील राजकीय नेत्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांनी टोकाचे स्वरूप धारण केले आहे. शिवसेना ठाकरे गटाला टार्गेट करण्यासाठी सत्ताधारी शिंदे गटापाटोपाठ आता भाजपही मैदानात उतरला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रचाराची झलक दिसू लागली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर गेल्या दोन वर्षांपासून शहरातील सिडको भागाचे राजकीय वादाचे केंद्र ठरले आहे. प्रारंभी महायुतीच्या शिंदे गटाकडून त्यांना पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणात लक्ष करण्यात आले होते. आता त्यात भाजपही मैदानात उतरला आहे.

भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी याबाबत श्री बडगुजर यांच्या विरोधात आपल्याला ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात केली आहे. यामध्ये श्री. शहाणे यांनी एका ऑडिओ क्लीपचा आधार घेतला आहे. त्यात एका व्यक्तीने श्री. शहाणे यांच्यावर आरोप करीत धमकी दिली आहे.

आपल्या मित्राला शहाणे यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाचा उल्लेख त्यात आहे. या संदर्भात आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मित्राने शहाणे यांना दूरध्वनी करून त्याबाबत जाब विचारला होता. संबंधित व्यक्ती मद्यपान केलेली होती.

या संभाषणाचा ऑडिओ आता पुढे आला आहे. ही ऑडिओ रेकॉर्डिंग दोन्ही घटकांकडून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे. यामध्ये आपल्या मित्राच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या माजी नगरसेवक शहाणे यांना संबंधित व्यक्ती जाब विचारत आहे.

त्यात भाजपच्या नेत्यानेच `तू बडगुजर यांचा माणूस आहे का` अशी विचारणा केली आहे. यामध्ये या कॉलचा आधार घेऊन श्री शहाणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस ठाणे गाठले. त्यानंतत्र अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन श्री शहाणे यांना आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने मोर्चा काढून सध्या गाजत असलेल्या प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात शहाणे यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे घाबरलेल्या शहाणे यांनी हा आरोप केल्याचा दावा करण्यात आला.

एकंदरच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये हे राजकीय युद्ध रंगले आहे. त्यात एकमेकांचा राजकीय हिशेब करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न बडगुजर विरोधक करीत आहेत. त्यामुळे नाशिक शहरात राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचे मनोरंजन म्हणून चर्चा चर्वण चांगलेच रंगले आहे.

एकंदरच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात श्री बडगुजर यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर झाल्यासारखीच आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राजकीय डावपेच आखले जात आहेत. त्यात टोकाचे आरोप प्रत्यारोप होऊ लागल्याने वातावरण गढूळ बनले. त्यामुळे आता हे प्रकार कोणत्या थराला जातात याची नागरिकांनाही चिंता आहे.

-------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT