Dipti Waje, Rajabhau Waje & Manikrao Kokate
Dipti Waje, Rajabhau Waje & Manikrao KokateSarkarnama

Nashik Politics : कोकाटेंना आव्हान देणारा उमेदवार कोण? राजाभाऊ वाजेंपुढे प्रश्न!

MP Waje's Litmus Test in Legislative Assembly Election Nashik Politics : सिन्नर मतदार संघाचे राजकारण आमदार माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे या दोन नेत्यांच्या भोवती फिरत राहिले आहे. गेल्या तीन निवडणुकांत हे दोघेच एकमेकांविरोधात उमेदवार होते
Published on

Waje Vs Kokate: सिन्नर विधानसभा मतदार संघ राजकीय दृष्ट्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मतदारसंघात पक्ष नव्हे तर नेता आणि गट या भोवती राजकारण फिरते. यंदा लोकसभेआधी असलेले राजकीय वातावरण आता विधानसभेला राहिलेले नाही.

सिन्नर मतदार संघाचे राजकारण आमदार माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे या दोन नेत्यांच्या भोवती फिरत राहिले आहे. गेल्या तीन निवडणुकांत हे दोघेच एकमेकांविरोधात उमेदवार होते. यंदा त्यात नव्या नेतृत्वाला संधी शोधण्याचा प्रयत्न होत आहे.

ही निवडणूक खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी सत्वपरीक्षा असेल. उदय सांगळे यांची अपक्ष उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपली ताकद किती? याचे उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल.

एकंदरच यंदा तिरंगी लढत असेल. त्यात महायुतीचे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे आणि अपक्ष सांगळे हे दोन उमेदवार निश्चित आहेत. तिसरा उमेदवार कोण हा सध्या सर्वच राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

Dipti Waje, Rajabhau Waje & Manikrao Kokate
Nashik politics: इच्छुक मामा ठाकरेंची झणझणीत मिसळ आमदार सीमा हिरे यांनीही चाखली!

लोकसभा निवडणुकीपूर्वी सिन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार कोकाटे यांना खुप अनुकूल स्थिती नव्हती. लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळाली. ते खासदार झाले. त्यामुळे सिन्नरच्या राजकारणात एक राजकीय पोकळी निर्माण झाली.

या राजकीय पोकळीचा सर्वाधिक फायदा आमदार कोकाटे घेऊ शकतात. खासदार वाजे यांच्याशीच थेट संबंध असलेले उदय सांगळे लोकसभा निवडणुकीत वाजे गटापासून दूर होते. आता ते विधानसभेला आपले नशीब आजमावणार आहे.जो पक्ष उमेदवारी देईल तिकडे जाण्याची त्यांची तयारी आहे.

या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सर्व निर्णय खासदार वाजे यांच्यावर येऊन थांबतात. यासंदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाजे यांनी लोकसभा निवडणुकीची परतफेड म्हणून सिन्नर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्याचे संकेत दिले आहेत.

Dipti Waje, Rajabhau Waje & Manikrao Kokate
Malegaon Politics: महापालिका आयुक्त विरोधात थेट एसीबी कडे धाव, कचऱ्यावरून राजकारण तापले

सिन्नर मतदारसंघ कोणाला आणि उमेदवार कोण? हे निर्णय पूर्णतः खासदार वाजे सांगतील तसे होणार आहेत. त्यामुळे वाजे यांच्या पश्चात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढणे तेवढे सोपे नाही. आमदार कोकाटे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेली जमवाजमव. स्थानिक नेत्यांशी टाळलेले राजकीय संघर्ष आणि निधीचा पाडलेला पाऊस, यामुळे आपले स्थान बळकट केले आहे.

येत्या 30 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिन्नरला निमंत्रित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांचा हा दौरा झाल्यास आमदार कोकाटे यांच्या उमेदवारीची ती घोषणा असेल.

आमदार कोकाटे महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सिन्नर तालुक्यातील अस्तित्व एका समाजापुरते मर्यादित आहे. उदय सांगळे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यास भाजपचे अस्तित्व किती? असा प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे आमदार कोकाटे यांना आव्हान देऊ शकेल असा उमेदवार महायुतीमध्ये सध्या तरी नाही.

महाविकास आघाडीची स्थिती देखील याहून वेगळी नाही. सध्या महायुतीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, राजाराम मुरकुटे, ॲड संजय सोनवणे हे इच्छुक आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे चिरंजीव राजेश गडाख, आमदार कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे, माजी सभापती बाळासाहेब वाघ, रवींद्र पवार, अरुण वाघ यांची नावे चर्चेत आहेत.

यातील इच्छुकांनी निवडणूक लढवू शकतो हा विचारच दोन महिन्या आधी घेतला आहे. त्यामुळे त्यांची तयारी किती आणि सबंध मतदार संघात स्वीकारला जाईल असा चेहरा कोण हा गंभीर पेच आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघाची सर्व राजकीय शक्यता आणि निर्णय खासदार वाजे यांच्या भोवती फिरत आहेत. अशा स्थितीत श्री वाजे यांना मनापासून सिन्नर मतदारसंघ ताब्यात घ्यायचा असल्यास आमदार कोकाटे यांना आव्हान देऊ शकेल असा उमेदवार द्यावा लागेल.

त्याचे उत्तर पुन्हा वाजे या नावावरच येऊन थांबते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तरी राज्यातील राजकीय कल पाहता सिन्नर मध्ये परिवर्तन करावयाचे असल्यास खासदार वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे ऐनवेळी उमेदवार होऊ शकतात. यातील कोणता आणि काय निर्णय होतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com