Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat : सुजय विखे थांबायला तयार नाय; थोरातांच्या घरासमोर जात..!

Pradeep Pendhare

Ahmednagar News : माजी खासदार सुजय विखे आता काही थांबालया तयारी नाहीत. संगमनेर मधून विधानसभा निवडणुकीचं 'फिक्स' असल्याचे संकेत त्यांनी अधिक स्पष्ट केले. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावात जाऊन सुजय विखे यांनी त्यांना राजकीय आखाड्यात उतरत असल्याची ललकारी दिली.

'संगमनेर तालुक्यानं त्यांना 35 वर्षे दिली, मला फक्त पाच वर्षे द्या', असं आवाहन माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेरकरांना केलं आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विखे आणि थोरात यांचा राजकीय संघर्ष पराकोटीचा होणार असून, त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटणार, असं बोललं जात आहे.

भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आणि माजी खासदार सुजय विखे यांचे संगमनेरमधील दौरे गेल्या काही महिन्यांपासून वाढलेत. त्यामुळे संगमनेरमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळाच राजकीय संघर्ष समोर येईल, अशी अटकळ आहे. मंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांच्या गणेशोत्सवानिमित्तानं संगमनेरमधील वेगवेगळ्या मंडळांना भेटी असतील, किंवा गेल्या काही दिवसांपासून मंत्री विखे यांचे सततचे दौरे, त्यामुळे बाळासाहेब थोरातांना पूर्ण घेरण्याची तयारी विखेंकडून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

सुजय विखे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तसं त्यांनी भाजप श्रेष्ठींकडे तिकीट देखील मागितलं आहे. सुरूवातीला त्यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभापैकी कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर त्यांनी थेट संगमनेरकडे रोख वळवला. विखे पिता-पुत्र यांनी देखील तयारी सुरू असल्याचं वारंवार संकेत दिले. 'सुजय विखे निर्णय घेण्यास सक्षम असून, त्यांनी घेतलेल्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे', असं मंत्री विखे सातत्यानं सांगत आहेत.

यावरून मंत्री विखे यांच्या डोक्यात संगमनेरबाबत मोठं 'राजकारण शिजत' असल्याच्या चर्चेला जोर धरला आहे. यातच बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या जोर्वे (हे गाव राहाता विधानसभा मतदारसंघात येते) या होम ग्राऊंडवर जाऊन सुजय विखेंनी थोरातांना राजकीय संघर्षासाठी तयार राहण्याचं आव्हान दिलं.

सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी 'जोर्वे गावानं आजपर्यंत विकासाच्या कामावर विखे परिवाराला साथ दिली. विकास काय असतो, ते मंत्री विखेंनी कामातून दाखवून दिलं आहे. आता तालुक्यातील अन्य गावात युवकाच्या सहकार्यानं विकासासाठी परिवर्तन घडवायचं आहे. संगमनेरकरांनी त्यांना 35 वर्षे दिली, आता माझ्यासारख्या युवकाला पाच वर्ष द्या.' अशी साथ घातली आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेरकरांना, अशी भावनात्मक साथ घातल्यानं संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांचा राजकीय संघर्ष अटळ असून, त्याचे धक्के राज्याच्या राजकारणापर्यंत बसणार, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

सुजय विखे काय म्हणाले? -

सुजय विखे म्हणाले, "2009 पासून या गावात विकासाची प्रक्रिया सुरू झाली. या वर्षात मंत्री विखे यांनी उपलब्ध करून दिलेला निधी पाहाता, यापूर्वी या भागातून आमदार निवडून कसे गेले? असा प्रश्न पडतो. शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोर्वे गाव समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागला. कोविड संकटात इथले लोकप्रतिनिधी कुठे होते? जेव्हा लोकांना औषधांची गरज होती, तेव्हा फक्त विखे परिवार उभा राहिला आणि त्यातून जोर्वे कोविड सेंटर सुरू केलं नाही. गावात पूर आला, तेव्हा सुध्दा गावाकडे पाठ फिरवाऱ्यांना लोकांनी पुरते ओळखलं आहे".

तसेच 'गेली अनेक वर्षे सर्व सत्तास्थानं त्यांच्या कुटुबांच्या ताब्यात आहेत. तेच ठेकेदार आणि तेच पदाधिकारी अनेक वर्षे पाहायला मिळतात. राहाता तालुक्यात सर्व पद सामान्य माणसाच्या ताब्यात आम्ही दिली. इथं तर सहकारी संस्था नातेवाईकाच्या ताब्यात आहेत. आमच्यावर दहशतीचा आरोप करता इथं, तर सामान्य माणसाच्या आदिवासींच्या जमिनी बळकावण्याच्या घटना मोठ्या घडत आहे. मग दहशत कोणाची?' असा प्रश्न सुजय विखे यांनी उपस्थित केला.

औद्योगिक वसाहत आणता आली नाही -

अनेक वर्षे तालुक्यात रोजगाराचा प्रश्न आहे. एक औद्योगिक वसाहत इथल्या लोकप्रतिनिंधीना आणता आली नाही. साडेसात वर्षे मंत्री होते. पण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी मतदार संघातील औद्योगिक वसाहती करीता 500 एकर जागा मंजूर करून आणली. आता उद्योग येण्यास प्रारंभ झाल्याचं माजी खासदार सुजय विखेंनी सांगितलं.

तसेच विकास प्रक्रियेच्या जोरावरच जोर्वे ग्रामपंचायत मध्ये युवकांनी विजय घडवला. आता तालुक्यातील प्रत्येक गावातील युवकांच्या सहकार्याने असेच परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे. तुमच्या पाहुण्यांना आणून इथली विकास कामं दाखवा आणि आता नातेवाईकांना हळूहळू फोन करायला सुरवात करा, असं सूचक वक्तव्य करून माजी खासदार सुजय विखेंनी संगमनेरातून लढण्याचे संकेत दिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT