Sujay Vikhe Says  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sunetra Pawar deputy CM oath : सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या अन् मोठं षडयंत्र हाणून पडलं; सुजय विखेंचा मोठा दावा

Sunetra Pawar Takes Oath as Deputy CM After Ajit Pawar Demise; Sujay Vikhe Says Conspiracy Against NCP Failed : सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला अस्थिर करण्याच्या चर्चांमागील षडयंत्र हाणून पाडल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी केला.

Pradeep Pendhare

Maharashtra breaking news : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर खळबळजनक दावा केला आहे. या चर्चांमागे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अस्थिर करण्याचं षडयंत्र होतं, असा दावा विखे पाटील यांनी केला आहे.

'अजित पवार यांच्या अकाली निधानंतर, त्यांची राष्ट्रवादी अस्थिर करण्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांमागे षडयंत्र होती. सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पक्षाच्या नेतेपदी जाण्याचा घेतलेला निर्णय, या चर्चा थांबवल्या आहेत. सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानतंर राजकारण स्थिर झालं. पक्ष स्थिर झाला. आमदारांना, कार्यकर्त्यांना आणि लोकांना देखील पुढचा नेता कोण हे कळलं,' असे सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

सुनेत्राताईंच्या शपथविधीवर चर्चा अन् संभ्रम निर्माण करणाऱ्यांना सुनावताना, इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर, त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी काँग्रेसने राजीव गांधी यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती, याची देखील सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी आठवण करून दिली.

भाजपचे (BJP) सुजय विखे पाटील म्हणाले, "राजकारणामध्ये मनाला पटत नसले, तरी काही निर्णय घ्यावे लागतात. सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आनंद झाला असेल का? राजकारणामध्ये स्पष्ट संकेत देण्यासाठी, पक्ष स्थिर ठेवण्यासाठी पक्षांमध्ये कोणतीही वेगळी चर्चा न होण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. शपथविधी नसता झाला तर, या लोकांनी आता सुरू असलेली चर्चा खूप पुढे नेले असती, त्याच्यामागे एक षडयंत्र होतं, पक्ष अस्थिर करण्याचं षडयंत्र! अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये अस्थिर करण्याचं षडयंत्र होतं, उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानंतर राजकारण स्थिर झालं. पक्ष स्थिर झाला, आमदार, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकांना देखील पुढचा नेता कोण हे कळलं."

'अजितदादांचे निधन हे त्यांच्या कुटुंब पुरतं मर्यादित नाही, तर त्यांच्या पक्षाबरोबर, त्यांचे असलेले आमदार, खासदार, मंत्री, नेते कार्यकर्ते पदाधिकारी संघटना, हा परिवार आहे आणि सुनेत्राताईंनी त्यांची काळजी घेण्यासाठी हा शपथविधी पूर्ण केला. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधी पूर्वी काँग्रेसने त्यांच्या गटाचा नेता राजीव गांधी यांना नेमलं होतं. महाराष्ट्रमध्ये होणारी ही काही पहिली घटना नाही. यावर आपण वेगवेगळ्या चर्चा करणं योग्य राहणार नाही,' असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटले.

भाजपसह शिवसेनेबरोबर चर्चा करावी लागणार...

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहेत, त्यावर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्ट केलं आहे की, त्यावर आम्ही बोलणारे खूप छोटे आहोत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी काय निर्णय घ्यायचाय तो त्यांनी घ्यावा आणि त्यांनी तो घेतलेला आहे. या व्यतिरिक्त त्यांना कोणता निर्णय घ्यायचा असेल तर, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की, ते भाजपबरोबर सत्तेत आहेत, भाजपच्या सहमतीने तो निर्णय घेणे अपेक्षित आहे." भाजपबरोबरच नाही तर, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाशी देखील त्यांनी चर्चा करणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगून देखील काही लोक घाई करत आहेत. एखादं प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये विकतोय आणि ते घ्यावंच लागेल, अशा पद्धतीची घाई करत आहेत. हे कमालचं आहे अन् त्यात कुठेतरी लाचारी देखील दिसते, असेही चर्चा करणाऱ्यांना सुजय विखे पाटील यांनी सुनावले.

शंका-कुशंका घेण्याचा धंदा

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेससह दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर, त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर, सुनेत्राताईंच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेवर अनेक चर्चा सुरू आहेत. त्यावर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, "मी या चर्चांवर खूप वाईट बोलू शकतो. पण माझ्या मनाला ते पटत नाही. काही लोकांनी शंका-कुशंका घेण्याचा जो धंदा चालवलेला आहे तो, अतिशय वाईट आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यपद्धती कशी असावी हे त्यांच्या नेत्याचे पक्ष सोडून सर्वच त्यांना शिकवायला लागले आहेत. जे शिकवायला लागले त्यांचा काय संबंध आहे, काय अधिकार आहे. त्यांचा पक्ष आहे. त्यांच्या आमदारांचा अधिकार आहे. पक्षाचे आमदार बोलत नाही. पक्षाचे नेते बोलत नाहीत. इतर पक्षाचे नेते ठरवतात की त्या पक्षाचं काय झालं पाहिजे. किती हास्यस्पद गोष्ट महाराष्ट्रात सुरू आहे."

योग्य लोकप्रतिनिधी, योग्य पदावर पाठवा

'विमान अपघाताचा जो वाद आहे, तो ब्लॅक बाॅक्सच्या चौकशीत समोर येईलच. ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट येणारच आहे. जे लोकप्रतिनिधी यावर चर्चा करत आहेत, या वेळी मी पुन्हा लोकांना आठवण करून देईल की, योग्य लोकप्रतिनिधी योग्य पदावर पाठवा. असे लोकप्रतिनिधी पाठवल्यास हेच म्हणणार, कोणी बॉम्ब लावलाय, हे गळून पडलं, हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहेत. एक व्यक्ती गेली आहे. त्याबाबतीत संवेदनशीलता ठेवा. त्या व्यक्तीच्या परिवाराचे व्यक्ती काही आरोप करत नाहीत. त्यांच्या परिवाराचे कोणी म्हणत नाही घात झालाय, पण बाकीच्यांना लय काळजी लागली आहे. हे काय चाललय महाराष्ट्रात, गलिच्छ राजकारण सुरू आहे. यापूर्वी असे महाराष्ट्र असे राजकारण नव्हते,' अशा शब्दात सुजय विखे पाटील यांनी सुनावले.

चौकशीची मागणी करण्याचा पहिला अधिकार पवार परिवाराचा

'राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वाधिकार आहे, काय निर्णय घ्यायचा असेल तो ते घेतील. पण इतर पक्षांनी कोणी बोलू नये. जर अजितदादांवर घात झाला असेल, तर त्या संदर्भात चौकशी करण्याचा आणि तशी मागणी करण्याचा पहिला अधिकार हा त्यांच्या परिवाराचा आहे. मुलाला नाही वाटत का? आपल्या वडिलांचा घात झालेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी. बायकोला वाटत नसेल का? आपल्या नवऱ्याचा घात झाला आहे, त्याची चौकशी व्हावी. परिवार बाजूला ठेवून बाकीचेच लोक पेटून उठले आहेत हे काय चाललंय हे मला कळत नाही,' असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT