Sunita Dhangar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sunita Dhangar News : सुनीता धनगरांनी १४२ शिक्षकांना बदल्यांसाठी प्रत्येकी ४० हजार मागितल्याची चर्चा

Nashik ACB News : शिक्षणाधिकाऱ्यांवर एक कोटीची लाच घेतल्याचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

Education officer Sunita Dhangar : महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर व कनिष्ठ लिपिक नितीन जोशी यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अटक झाली आहे. यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागातील त्यांनी केलेले आणखी कारनामे समोर येऊ लागले आहेत. महापालिका तसेच खासगी शाळांमधील १४२ शिक्षकांच्या बदल्यांसाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आता चौकशीची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे धनगर व जोशी यांचा पाय अधिक खोलात रुतत आहे.

निलंबित मुख्याध्यापकाला पुन्हा सेवेत घेण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunil Dhangar) यांच्यासह लिपिक नितीन जोशी यांना शुक्रवारी (ता. २) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणातून शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका तसेच खासगी शाळांमधील १४२ शिक्षकांच्या बदल्यांसाठी प्रत्येकी ४० हजार रुपयांची मागणी केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. आता शिक्षणाधिकारी धनगर व तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनेक 'कारनाम्यां'च्या कथांची चर्चा होत आहे.

महापालिका (Nashik Corporation) तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी लागते. या शाळांमधील सुमारे १४२ शिक्षकांच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर झाले होते. त्यात एका प्रकरणावर स्वाक्षरी करण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. शाळांवरील कारवाई थांबविणे, महापालिकेच्या शिक्षकांच्या बदल्या, उपशिक्षकांना पदोन्नती यासारख्या प्रकरणातही मोठ्या प्रमाणात आर्थिक मागणी केली जात होती. आता या सर्व प्रकरणांची चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे.

याबाबत जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. गिरीश मोहिते यांनीही पत्र दिले आहे. त्यासाठी शिक्षण विभागात (Education Department) मोठी साखळी अद्यापही कार्यरत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिक्षकांनी बदलीप्रकरणामुळे काही शिक्षकांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या मदतीने काही दिवसांपूर्वीच धनगर व इतर कर्मचाऱ्यांना 'ट्रॅप' करण्यासाठी 'फिल्डिंग' लावली होती. त्यापूर्वीच धनगर व जोशी दुसऱ्या प्रकरणात अडकले आहेत. आता या दोघांनाही कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

शिक्षकांच्या बदल्यांचा प्रस्ताव

लोकप्रतिनिधी नसल्याने त्यांच्या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या विविध सेवांमध्ये वर्ग करण्यात आले आहे. त्यातीलच काही कर्मचारी शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांना शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असल्याचे बोलले जाते. या कर्मचाऱ्यांनी बदल्यांसाठी प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविला, मात्र प्रशासन विभागातच अडचणीच्या मोठा डोंगर असल्याची बाब लक्षात आली. दरम्यान, प्रशासन उपायुक्त बदलून गेल्यानंतर बदलीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय या कर्मचाऱ्यांनी घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT