Supriya Sule : विधानपरिषदेत जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ मंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलाच भोवला. त्यांचे कृषी खाते काढून घेण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सरचिटणीस व आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ समोर आणला होता. त्यावरुन कोकाटे यांनी आता रोहित पवार यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. त्यावरुन कोकाटे यांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
सुप्रिया सुळे या नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, नाशिकचे लोक जरा काही बोललं की केस करतात. पण मला काही केसची भिती वाटत नाही. करा केस..अब्रुनुकसानीचा दावा लावताय लावा... तुम्ही पत्ते खेळत होता, का मी खेळत होते पत्ते? म्हणजे गुन्हा मीच करायचा, कामावर असताना पत्ते मीच खेळायचे आणि मीच म्हणायचं ताई अब्रू काढली माझी.. असा टोला कोकाटे याचं नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी लगावला.
त्या पुढे म्हणाल्या तुमची अब्रू आम्ही नाही काढली तर तुमच्याच मागे तुमच्याच विचाराचा माणूस बसला होता. त्याने तुमची अब्रू काढली. मी नाही काढली... साधी गोष्ट आहे तुम्ही बसतात तर तुमच्याच मागचाच व्हिडीओ काढणार आहे. मग तुमचा कार्यक्रम आम्ही केला की तुमच्या मागच्यानेच केला. मग अब्रुनुकसानीचा दावा तुमच्या मागे बसलेल्यावर टाकायचा की माझ्या रोहित वर टाकायचा? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
मी सुप्रिया सुळे आहे. जो वार करेल तो समोरुन करेल. असा पाठिमागून करणार नाही. जे बोलायचं ते 'डंके की चोट पर', आपल्या मागे न ईडी, सीबीआय न कसल्या भानगडी. खाली हात आये ते और खाली हात जायेंगे असं म्हणत सु्प्रिया सुळेंनी टोला लगावला. पत्ते तुम्ही खेळायचे आणि नोटीस आम्हाला पाठवायची आणि आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारायच्या असं चालणार नाही असं सु्प्रिया सुळेंनी सुनावलं.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्यसरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. सगळ्यात मोठा अॅम्बुलन्सचा घोटाळा या सरकारने केला असा आरोप केला. या राज्यात काय चाललंय. आपण कशावर चर्चा करतो. कबुतर, कुत्रे...काय हरकत नाही करा. पण कधी कर्जमाफीवर आम्हाला उत्तर मिळेल का? या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर आल्यावर सरसकट कर्जमाफी करु असं आश्वासन दिलं होतं. मी तेव्हाच सांगितलं होतं हे खोटं बोलताय. तसच झालं. झाली का कर्ज माफी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते व सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ हेही उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.