Supriya Sule : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोन वेळा कोकाटे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यावर कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला होता. अखेर अजित पवार यांनी कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांना कृषीखाते देण्यात आले आहे. त्यामुळे भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री झाले आहेत. तर भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी कोकाटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आता यावरून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून प्रहार केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्ट करत सरकारच्या या निर्णयाविरोधात टिका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे, याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे.
सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटलं आहे की, महाराष्ट्र शासनाला 'भिकारी' म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.