Nashik News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं. या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास सुरू असून रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच या प्रकरणाबाबत अनेक उलटसुलट चर्चांनाही उधाण आलं आहे. अशातच राज्य सरकारने अशोक खरात प्रकरणी नेमल्यानंतर तब्बल 17 दिवसांनी आयपीएस अधिकारी व एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत तपासामधील महत्त्वाची अपडेट दिली आहे.
एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आणि आयपीएस अधिकारी यांनी मंगळवारी(ता.7 एप्रिल) पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी एसआयटीच्या नियुक्तीपासून ते आजपर्यंतच्या अशोक खरात प्रकरणाच्या तपासाबाबत सविस्तर माहिती दिली.
तेजस्वी सातपुते म्हणाल्या, अशोक खरातविरोधात आत्तापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी तर 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलिस आणि 1 गुन्हे नाशिक पोलिस करत आहे.यात एसआयटीकडे असलेल्या 9 पैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणांसंदर्भातले असून 3 गुन्हे फसवणुकीचे असल्याचंही सातपुते यांनी सांगितलं. तसेच आठ आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आल्याचंही त्यांनी माहिती दिली.
तसेच अशोक खरातने पीडित महिलांना त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या मृत्यूची, बदनामीची भीती दाखवून धमकावत महिलांचे लैंगिक शोषण केल्याचंही सातपुते यांनी सांगितलं. तसेच त्यानं लोकांकडून पूजाविधी, खडे, चिंचोके, रुद्राक्ष यांसारख्या माध्यमांतून अंधश्रध्दा पसरवत पैसे उकळल्याचंही एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाल्याचं तपास अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं.
एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा एकूण 24 पथकांकडून तपास सुरू असल्याचंही सांगितलं. तसेच या प्रकरणासंदर्भात एसआयटीच्या पथकातील 4 जणांच्या सायबर टीमनं आत्तापर्यंत तब्बल आक्षेपार्ह अशा 4650 लिंक हटवल्याची धक्कादायक माहिती दिली. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकले असून पीडितांचे व्हिडीओ प्रसारित करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या.
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते म्हणाल्या, या प्रकरणात आत्तापर्यंत 30 महिलांचे जबाब नोंदवले आहेत. अशोक खरात विरोधात आता अनेक महिलांनी हिंमत दाखवली आहे. संबंधित पीडित महिलांनी कुटुंबांना विश्वासात घेऊन धाडस दाखवत पुढे आल्या आहेत. खरातच्या मालमत्तेबाबतचा तपास ईडी आणि एसआयटीकडून संयुक्तरित्या केला जाणार असल्याचं तेजस्वी सातपुते यांनी म्हटलं आहे.तसेच या 40 ते 45 दिवसांमध्ये 8 गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणार असल्याचंही सातपुते यांनी सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.