प्रदीप पेंढारे
Nagar Political News : नगर जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे चित्र आज स्पष्ट झाले. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अर्ज माघारी घेण्याच्या निमित्ताने आजचा दिवस रुसवे-फुगवे काढण्यातच गेला. उद्यापासून उमेदवार प्रचाराबरोबरच पॅनेल आघाड्यांच्या कामाला लागणार आहेत. यानंतर प्रचाराचा धुरळा वेगाने उडेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगर जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ४ हजार २६५ आणि सरपंच पदासाठी ७११ विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींमधील १ हजार ७०१ सदस्य पदाच्या जागांसाठी ७ हजार २६०, तर १९४ सरपंच पदासाठी १ हजार ३११ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
नगर जिल्ह्यातील ७३ जागांवर ग्रामपंचायतींत पोट निवडणुका होत आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणचे तहसील कार्यालयांमध्ये गर्दी होती.
राजकीय नेत्यांकडून पॅनेल निश्चित केले आहे. त्यामुळे माघार घेण्याच्या आजच्या दिवसाकडे लक्ष लागले होते. यामुळे सकाळपासून तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी होती. उमेदवारांकडून एकमेकांची समजूत घालून अर्ज मागे घेण्याची विनंती केली जात होती.
रुसवे-फुगवे दूर करण्यात येत होते. शब्द दिले जात होते. 'काही जण अपक्ष म्हणून आजमावून पाहत आहेत', असे सांगून वेळ मारून नेत होते. 'समोरच्याची जिरवायची हाय, आहे म्हणून रिंगणात उरतोय', असे छाती ठोकपण सांगत होते. गटा-तटाचे राजकारण बाहेर काढले जात होते.
'खालच्या-वरल्या आळीचा', हा हिशोब मांडला जात होता. 'माझे काम करत नव्हता, म्हणून आडवा पडलोय', अशी चिथावणीखोर भाषा रंगली होती. 'आमदार, खासदारांचे नाव करून फोन करतो काय, आता पाहतोच', असे म्हणून काहींनी शड्डू ठोकला होता.
यातच चहा-पाणी, नाश्ता होत होते. काही जण 'ठरलं आहे ना, माघार घेतोय म्हणून', असे सांगून निघून जात होते. मोबाईल बंद करून ठेवत होते. यातून समोरच्याची चिडचिड होत होती. शिवराळ भाषा वापरून राग व्यक्त होत होता.
महिला उमेदवार गडी माणसं सांगतील, तशा भूमिका घेत होत्या. एकत्र येऊन गावकडच्या गोष्टीत रमल्या होत्या. काही महिलांनी एकत्र येत फराळ केला. काही जण समजुतीची भूमिका घेत माघार घेत होते. यातून निवडणुकीच्या रिंगणात राहणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर स्मित हास्य उमटते होते. एकदंर 'कही खुशी-कही गम', असे चित्र तहसील कार्यालयांच्या आवारामध्ये रंगले होते.
नगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या १ हजार ७०१ जागांसाठी दाखल ७ हजार २६० उमेदवारांपैकी कितींनी, तर सरपंच पदाच्या १९४ जागांसाठी १ हजार ३११ उमेदवारांपैकी किती जणांनी माघार घेतली, याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत विभाग तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडून घेत होते.
राजकीय आखाडा रंगणार -
भाजप ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या रिंगणात संपूर्ण ताकदीने उतरणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पॅनेल उभा करण्याचा आदेश दिला आहे. सरपंचपदासाठी उमेदवार देण्याच्याही सूचना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या दौऱ्यामुळे नगर जिल्ह्यातील संपूर्ण भाजप व्यस्त आहे.
पंतप्रधानांचा हा दौरा संपताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकींमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात करणार आहे. काॅंग्रेसने, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेचे दोन्ही गट, 'मनसे', वंचित बहुजन आघाडी आणि 'एमआयएम'नेदेखील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.