Bachhu Kadu
Bachhu Kadu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raver APMC election news : बच्चू कडूंनी स्वतंत्र चुल मांडल्याने भाजपला चिंता!

Sampat Devgire

Raver APMC election news : बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष - शिवसेना (शिंदे गट) यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानेही दहा उमेदवार रिंगणात उतरवल्याने भाजपच्या चिंतेत भर पडली आहे. (BJP in tense after Prahar`s separate 10 candidates)

बाजार समितीत (APMC election) यापूर्वी सर्वपक्षीय पॅनल सत्तेत होते. त्यांनी सर्व कामकाज व ठराव एकमताने केले होते. आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) असे दोन स्वतंत्र पॅनल आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात ते एकमेकांवर काय आरोप करणार याची उत्सुकता आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक चुरस विकास सोसायटीच्या सर्वसाधारण गटात आहे. ७ जागांसाठी येथे तब्बल २३ उमेदवार रिंगणात आहेत. महिला राखीव गटात २ जागांसाठी ४ उमेदवार, इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या १ जागेसाठी २ उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या १ जागेसाठी ५ उमेदवार, ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण गटातून २ जागांसाठी ६ उमेदवार आहेत. ग्रामपंचायत गटात अनुसूचित जाती जमाती गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार, आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या १ जागेसाठी २ उमेदवार, व्यापारी गटातून २ जागांसाठी ४ उमेदवार आणि हमाल मापारी मतदारसंघातून १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये डॉ राजेंद्र पाटील, कैलास सरोदे आणि सय्यद अजगर सय्यद तुकडू हे तीन विद्यमान संचालक पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनलमध्ये गोंडू महाजन, दिलीप पाटील, गोपाळ नेमाडे आणि कल्पना पाटील हे चौघे विद्यमान संचालक पुन्हा मतदारांचा कौल आजमावत आहेत. भाजपचेच ज्येष्ठ कार्यकर्ते पीतांबर पाटील यांना त्याच पक्षाच्या पॅनलमध्ये जागा न मिळाल्याने ते स्वतंत्र उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश महाजन देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मावळते संचालक राजीव पाटील यांचे सुपुत्र पंकज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते व रावेर पीपल्स बँकेचे अध्यक्ष एस आर चौधरी यांनीही महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये वर्णी न लागल्याने आपली स्वतंत्र उमेदवारी कायम ठेवली आहे. मावळत्या संचालक मंडळातील माजी सभापती श्रीकांत महाजन यांच्यासह नीळकंठ चौधरी, विनोद पाटील, प्रमिला पाटील, प्रमोद धनके, अरुण पाटील, योगेश पाटील हे निवडणूकीपासून लांब आहेत.

मावळते संचालक मंडळ हे सर्वपक्षीय होते. त्यांनी ७ वर्षात सर्व ठराव एकमताने संमत केले आहेत. त्यामुळे ते एकमेकांवर टीका टिप्पणी करतील काय, आता प्रचारात एकमेकांविरुद्ध ते काय मुद्दे मांडतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT