Tribal Students Meet Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकमधून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लॉंग मार्च मध्येच आता उभी फूट पडली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण मिळालं आहे.
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवार (दि. २९) मुंबईतील वर्षानिवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने आश्रमशाळांमधील विविध प्रश्न, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षण, भोजन आणि इतर सुविधांशी नगडीत मागण्या मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी मागण्या कालबद्ध पद्धतीने सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर एका गटाने लॉंगमार्चमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर दुसऱ्या गटाने आश्वासनावर समाधान व्यक्त न करता मुंबईतील राजभवनाच्या दिशेने जाण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.
त्यामुळे, आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासह आदिवासी मंत्र्यांबरोबरच मुख्य सचिव व आदिवासी विकास आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात उभी फूट पडली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर एका गटाचे समाधान झाले नाही. त्यामुळे सुमारे ६० ते ७० आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलकामध्ये मतभेद उफाळून आले असून नाशिकसह धुळे, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांनी लॉंगमार्चमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनात स्पष्टपणे दोन गट पडल्याचे चित्र आहे. एक गट माघारी फिरला असला तरी दुसरा गट राजभवनाच्या दिशेने जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. केवळ आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यास या गटाने नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी नाशिकहून सकल आदिवासी समाजाचा लॉंगमार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता. आश्रमशाळांची झालेली दुरवस्था, विद्यार्थ्यांचे सातत्याने होणारे मृत्यू, सेंटर किचन बंद करणे, तसेच आदिवासी मंत्र्यांसह संबंधित सचिव आणि आदिवासी विकास आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा लॉंन्ग मार्च काढण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर या आंदोलनात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. निर्णायक टप्प्यावर आंदोलन पोहचले असताना आंदोलकांमधील मतभेद समोर आले आहे.
दरम्यान मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.