Maharashtra FDA administrative changes by Tukaram Mundhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा निर्णय! जिल्हा कार्यालयांचे अधिकार कापले; FDA प्रशासनातच खळबळ

Tukaram Mundhe cuts district office powers: भेसळ आणि गुटखा माफियांवर धडक कारवाई सुरू असतानाच तुकाराम मुंढे यांच्या नव्या आदेशानुसार कारवाईची माहिती थेट मुंबई मुख्यालयातूनच जाहीर होणार आहे.

Pradeep Pendhare

FDA Mumbai headquarters order : अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर आणि गुटखा माफियांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

त्यांच्या या आक्रमक कारवाईमुळे संबंधित माफियांचे धाबे दणाणले असतानाच आता त्यांच्या एका नव्या आदेशामुळे प्रशासनातच मोठी खळबळ उडाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

माहितीनुसार, राज्यातील कोणत्याही जिल्हा कार्यालयाने केलेल्या कारवाईची माहिती स्थानिक स्तरावर प्रसिद्ध करायची नाही, असा आदेश देण्यात आला आहे. यापुढे जिल्हा कार्यालयांनी केलेल्या सर्व कारवायांची माहिती थेट मुंबई मुख्यालयातून, म्हणजेच आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कार्यालयातूनच प्रसिद्ध केली जाणार असल्याचे समोर आले आहे. हा आदेश केवळ एका जिल्ह्यासाठी नसून राज्यातील सर्व कार्यालयांना लागू असल्याचे सांगितले जात आहे.

या संदर्भात नंदूरबार येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून एक संदेश समोर आला आहे. सहाय्यक आयुक्त सपना गोडसे यांनी समाज माध्यमांवर दिलेल्या निर्देशांनुसार, स्थानिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रेस नोट जारी करायची नाही. तसेच वृत्तपत्रे किंवा डिजिटल न्यूज पोर्टल्सना कारवाईबाबत थेट माहिती द्यायची नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आल्याचे समोर आले आहे.

या आदेशानुसार, विभागीय कारवाईसंबंधित सर्व प्रेस नोट्स आणि माहिती यापुढे फक्त मुख्यालय, मुंबई (Mumbai) येथूनच प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतरच ती माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवली जाईल. या आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या संदेशाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील अनेक स्थानिक माध्यमांनी नाराजी व्यक्त केली आहे. फक्त माध्यमांमध्येच नाही तर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमध्येही मुंढे यांच्या या केंद्रीकृत कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

तुकाराम मुंढेंची बदली न करण्याची मागणी

मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे. भेसळ आणि गुटखा हा थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असल्यामुळे त्यांच्या कारवाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेकांनी तर तुकाराम मुंढे यांची या विभागातून बदली होऊ नये, अशी मागणी सुरू केली आहे.

तुकाराम मुंढेंच्या समर्थनात सर्वसामान्य

विशेष म्हणजे, भेसळखोरांविरोधातील कारवाईला वेग मिळत असल्याने काही ठिकाणी नागरिकांनी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून पाठिंबा दर्शवला आहे. असे असले तरी मुंढे यांच्या काही कारवाया वादातही अडकताना दिसत आहेत.

वर्धा इथली कारवाई वादात अन् पोहोचली न्यायालयात

वर्धा येथील ऐतिहासिक गोरस भंडार संस्थेवर करण्यात आलेली कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या संस्थेवर FDA ने कारवाई करत परिसर सील केला आहे. प्रशासनाने स्वच्छतेतील त्रुटींचा दावा करत दूध संकलन, विक्री आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

तुकाराम मुंढे चर्चेच्या केंद्रस्थानी

या निर्णयामुळे शेतकरी आणि दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला असून हे प्रकरण आता थेट उच्च न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाने याप्रकरणी सरकारकडे स्पष्टीकरण मागितल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे भेसळखोरांविरोधातील कठोर भूमिका आणि दुसरीकडे प्रशासनातील नाराजी व न्यायालयीन वाद! यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT