Maharashtra politics news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वेगवान हालचाली सुरू आहेत. ठाकरे बंधूंची युतीच निवडणुकीत जवळपास निश्चित मानली जात आहे. ठाकरे बंधूंची युती झाल्यास राज ठाकरे महाविकास आघाडीत येतील की, महाराष्ट्रसोडून मुंबईसाठीच ठाकरे बंधूंची युती राहील की, अन्य काही राजकीय पर्याय आहेत, ही सर्व गणिते गुलदस्त्यातच आहेत.
या सर्वात महाविकास आघाडीतील काँग्रेसची कोंडी झाली आहे. राज ठाकरे अन् काँग्रेसचं जुळणार का? ही चिंता आहे. यावर सोल्यूशन काय? या प्रश्नावर बाळासाहेब थोरात, यांनी यासाठी लवकर मुंबईत शरद पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार असल्याचे सांगितले.
शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर, विधानसभा निवडणुकीतील राजकीय गणितं महायुतीच्या बाजूनं गेल्यानंतर मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं राजकीय गणित जुळेल का? हा प्रश्नच आहे. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत तुम्ही त्यांच्यासोबत राहणार आहात का? थोरात म्हणाले, "त्यावर चर्चा सुरू आहेत. त्यांना भेटणार आहोत. मुंबईत (Mumbai) चर्चा सुरू आहे. पवारसाहेबांना भेटणार आहोत. तसंचउद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. यावर लवकर तोडगा निघेल." शेवटी काय तर, भाजपची कार्यपद्धती, तत्त्वज्ञान, विचारसरणी मान्य नाही, त्याच्याविरोधात आम्ही काम राहणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट सांगितले.
देशाच्या राजकीय पातळीवर भाष्य करताना थोरात यांनी, देशातील राजकारणाची पातळी खालवली आहे. आपला माजी उपराष्ट्रपती सापडत नाही, तोच अजून निवडणूक आयोगाचा माजी आयुक्त गायब आहे. राजकारणातील वक्तव्य कशी आहे, हे दिसते आहे. राज्यातील राजकारणातील 'पातळी' हा शब्द संपलाच, 'तळ' गाठला आहे. राज्यातील आमदार कसे वागत आहेत, गोळीबार काय चालू आहेत, शिवीगाळ करत आहेत, बीडमध्ये खून पडत आहेत, महाराष्ट्रात चांगल्या माणसांना अवमानीत केलं जात आहे, असं राजकारण झाल्याचं सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पाच हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. 15 एकर जमीन एका कुटुंबाला दिल्याचे म्हटले आहे. मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. यावर थोरात म्हणाले, "मंत्र्यांचे घोटाळेच घोटाळे आहे. कोण-कोणत्या घोटाळ्यावर बोलायचं हा प्रश्नच आहे. अनेक अडचणीत आहेत. लोकांची दिशा, विचार बदलून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोहित पवार यांनी काही आरोप केले असतील, तर त्याची सरकारने चौकशी केली पाहिजे."
संगमनेरमधील कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या प्रकरणात पोलिस खोट बोलत आहेत का? या प्रश्नावर थोरातांनी, 'पोलिस हे पूर्णपणे दबावाखाली आहेत. स्वतंत्र यंत्रणा असून, ती निष्पक्ष राहिलेली नाही. तशी ती असली पाहिजे. परंतु दुर्दैवानं, ती यंत्रणा कुणाच्या तरी फोनमुळे दबावात वागते, हा दबाव इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नातचा भाग आहे. जे युवक पुढं येतील, त्यांचा छळ करण्याचा प्रकार आहे. काही युवक हजर नव्हते, त्यांची देखील नावं गुन्ह्यात आल्याचं समजत आहे.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.