Uddhav Thackeray Balasaheb Thackeray radhakrishna vikhe balasaheb vikhe  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : "विखेंच्या वडिलांना बाळासाहेबांनी पहिल्यांदा मंत्री केलं, पण...", ठाकरेंनी सगळंच काढलं

सरकारनांमा ब्यूरो

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी विखेंच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यावर हल्लाबोल केला. "जनतेच्या आशीर्वादानं आमची सत्ता आल्यावर यांच्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी लावणार," असा इशारा उद्धव ठाकरेंनी विखे पिता-पुत्रांचं नाव न घेता दिला आहे.

'जनसंवाद यात्रे'च्या निमित्ताने उद्धव ठाकरे सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ( Shirdi Loksabha Election 2024 ) विविध विधानसभेचा दौरा करत आहेत. मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) विखे-पाटलांच्या मतदारसंघातील राहाता शहरात झालेल्या जनसंवाद मेळाव्यात ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"जिथे सत्ता तिथे आम्ही अशी यांची सवय"

उद्धव ठाकरे म्हणाले, "विखेंच्या वडिलांना शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यात पहिल्यांदा मंत्री केले. पण, तेही ते विसरले. मात्र, जिथे सत्ता तिथे आम्ही अशी यांची सवय. पण, आता कुठे जाणार? कारण भाजप त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या ठिकाणी असून पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना विचारतो ते परत आले, तर तुम्ही त्यांना घेणार का? मी तर त्यांना घेणारच नाही आणि तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यावर त्यांच्या सगळ्याच भ्रष्टाचाराची चौकशी लावणार आहे."

"उद्याचा दिवस आमचा आहे"

"तुम्ही उतमात करत आहे. तुम्हाला वाटत असेल कोणी विचारणार नाही. पण, असं नसतं. सगळे दिवस सारखे नसतात. दिवस बदलतात. आज तुम्हाला वाटतं की तुमचे दिवस आहे. मात्र, उद्याचा दिवस हा आमचा आहे," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी विखे-पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

"शाह अन् फडणवीस घरफोडेमंत्री"

"भाजपचा आमदार भर पोलीस ठाण्यात गोळीबार करतो. पण, गुंडागर्दीवर जरब बसवण्याऐवजी आमच्या राज्याचे निर्ढावलेले गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री दुसऱ्याची घरं फोडत आहेत. त्यामुळे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीऐवजी घरफोडेमंत्री, असा बदल करून घ्यावा," असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

"सरकारमान्य गुंडागर्दी कोण रोखणार?"

"शिर्डीत जुलूम जबरदस्ती गुंडाश्रय वाढलेला आहे. ही गुंडागर्दी सरकारने संपवायला हवी. पण, जसं सरकारमान्य देशी दारूचं दुकान असते. तसे सरकारमान्य ही गुंडागर्दी असेल तर याला रोखणार कोण?" असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT