Ahmednagar News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिर्डी दौऱ्यावर असून, त्यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचे राहुरीत जोरदार स्वागत केले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी प्राजक्त तनपुरे यांना पाहताच, 'काय रे बाबा जागेवर आहेस ना ? ', असा मिश्लिक टोला लगावला. ठाकरे यांनी मारलेल्या या मिश्किल टोल्याची नगरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Uddhav Thackeray Shirdi Visit)
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा राहुरीत येताच जोरदार स्वागत केले. या वेळी ठाकरे यांनी छोटेखानी भाषण केले. ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. त्या कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी फिरत आहे. मोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्रात मैदान मोकळे झाले, असे भाजपला वाटत आहे. पण मी मैदानात आहे. येथे गवतालाही भाल्याची पाती फुटतात, हे त्यांना माहीत नाही.
पुढची निवडणूक भ्रष्ट नेते आणि संतापलेले मर्द मावळे यांच्यात होणार आहे. वाहनातून खाली उतरताच प्राजक्त भेटला. काय रे बाबा जागेवर आहेस ना ? जागेवरच आहे. प्राजक्त पण आणि तुमचे मामा (जयंत पाटील) पण! मला याविषयी मनात पूर्ण विश्वास आहे. जनता पाय रोऊन उभी आहे. दिल्लीची पर्वा कशाला करायची ? तुमचा आवाज दिल्लीत उठवेल, असा खासदार परत दिल्लीला पाठवायचा आहे, असे ठाकरे यांनी म्हटले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपण पुढील सभेला येणार आहात का ? यावर कार्यकर्ते हो म्हटल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'आपण सभेला येणारच आहात, मग येथे कशाला बोलू'. उद्धव ठाकरे यांच्या या उत्तर गर्दीत एकच हशा झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार शंकरराव गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे, सतीश तनपुरे, रावसाहेब खेवरे, सचिन म्हसे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या सन्मानासाठी खूप मोठा फुलांचा हार आणला होता. ठाकरे यांनी तो स्वीकारला नाही. गर्दीमुळे तो हार तसाच राहून गेला. अवघ्या दोन मिनिटांच्या भाषणानंतर ठाकरे लगेच व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांच्या स्वागतासाठी आणलेला मोठा हार तसाच राहिला. शेवटी शिवसेना कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागील गाडीतून श्रीरामपूर आणि राहाता येथील स्वागतासाठी तो हार घेऊन गेले.
(Edited By-Ganesh Thombare)
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.