Shivsena Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Shivsena UBT Agitation: नाशिकात खड्ड्यांच्या समस्येवर ठाकरे गटही आक्रमक; घोडे, बैलगाड्यांसह आंदोलन!

Nashik Pothole Problem and Politics : आठवडाभरात रस्त्यांच्या सुधारणा न झाल्यास महापालिका आयुक्तांना खुर्चीत बसू देणार नसल्याचा इशारा याआधीच भाजपच्या आमदारांनी दिलेला आहे.

Sampat Devgire

Nashik Civic Issue News: नाशिक शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेविरोधात जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला आहे. नागरिकांकडून याबाबत लोकप्रतिनिधींविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे. त्याची प्रतिक्रिया गेल्या दोन दिवसांपासून शहरात दिसू लागली आहे. महापालिकेवर सध्या अशोक करंजकर हे प्रशासक आयुक्त आहेत. त्यांच्यावर राज्य शासनाचा थेट अंकुश आहे.

विविध कामकाजांबाबत पालकमंत्र्यांकडून सातत्याने सूचना आणि निर्देश दिले जातात. मात्र जनतेशी संबंधित समस्या आणि रस्त्यांची दुरावस्था कामकाजातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी याबाबत सत्ताधारी पक्षाकडूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद काल महापालिका आयुक्त यांना व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देण्यात आलेल्या इशारातून दिसली.

भारतीय जनता पक्षाच्या शहरातील तिन्ही आमदारांनी महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना अक्षरशा तंबी दिली. आठवड्याभरात सुधारणा न झाल्यास रस्त्यावर फिरणे मुश्किल करू. आयुक्तांना त्यांच्या खुर्चीत बसू दिले जाणार नाही, असा इशारा भाजपच्या आमदारांनी दिला होता.

त्यानंतर आज(बुधवार) शिवसेना(Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जेलरोड येथील खड्ड्यांच्या प्रश्नांवर एकवटले. यावेळी आंदोलन करण्यात आले. घोडे आणि बैलगाड्यांसह पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनातून शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन केले.

या आंदोलनातून राजकीय मायलेज मिळविण्याचा देखील त्यांचा प्रयत्न होता. त्यात ते काहीप्रमाणात यशस्वी झाल्याचे चित्र आहे. आंदोलनात स्थानिक नागरिक आणि महिला देखील सहभागी झाल्या. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय आणि अपघात यामुळे नागरिकांनी महापालिकेविषयी संताप व्यक्त केला.

माजी नगरसेवक प्रशांत दिवे, माजी उपमहापौर रंजनाताई बोराडे आणि मंगलाताई आढाव यांच्या पुढाकाराने आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरातील सर्व पदाधिकारी सहभागी झाल्याने नाशिक रोडचा हा महत्त्वाचा भाग आणि तेथील वाहतूक दीर्घकाळ ठप्प झाली होती. त्यामुळे पोलीस आणि महापालिका अधिकारी दोघांचेही चांगलीच तारांबळ उडाली.

यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, वरिष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी महापौर वसंत गीते, माजी आमदार योगेश घोलप, विभाग प्रमुख कुलदीप आढाव, शिवसेना नेते दिनकर आढाव, रतन बोराडे, सागर भोजने, बाळासाहेब शेलार या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

शिवसेना ठाकरे गटाकडून या आंदोलनाची गेले आठवडाभर जोरदार तयारी करण्यात आली होती. या संदर्भात महापालिकेला खड्डे बुजविण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. हा कालावधी संपल्यानंतर आज ठाकरे गटाने आंदोलनाचे शस्त्र उगारले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT