Uddhav Thackeray News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray Nashik News : महाराष्ट्राच्या हितासाठी कणखरपणे लढू; काळारामाच्या साक्षीने ठाकरेंची गर्जना

Uddhav Thackeray Nashik Visit Updates : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा सगळा इतिहासच काढला...

संपत देवगिरे : सरकारनामा

Uddhav Thackeray Nashik Visit :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना थेट आव्हान देत पीएम केअर निधीच्या चौकशीची मागणी केली. कॅगचा संदर्भ देत कोरोना काळात मृतांचे उपचार करून किती पैसे लुबाडले, ते सांगा असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आज येथे झाले. त्याचा समारोप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने झाला. यावेळी ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, जनसंघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व इतिहास मांडला. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लिम लीगशी युती करून शामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालमध्ये मंत्रीपद कसे उपभोगले हा तुमचा इतिहास आहे, असे म्हणत Uddhav Thackeray बरसले.

'शिवनेरी'ची माती असलेला कलश त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक आणि कुणाल दराडे यांना यावेळी सुपूर्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या प्रतिकाचे अंश असलेली ही माती राज्यभर जाऊ द्या. त्यातून आपल्याला केंद्रातील हुकूमशहा विरुद्ध लढायचे आहे. या लढ्यामध्ये महाराष्ट्र लढणार आहे. पण देश जिंकणार आहे. कारण आमची लढाई भारत मातेसाठी आहे. तोच आमचा वंश आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इथे तर गवतालाच भाले फुटतात. मात्र दुहीची बीजे खडकावरही फोफवतात. हेच आज भाजप करीत आहे. इंग्रजांची ही नीती ते पुढे नेत आहे, असा हल्ला ठाकरेंनी चढवला.

भाजपच्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे नेते शामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालमध्ये चले जाव चळवळ चिरडण्यासाठी गव्हर्नर यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव केलेल्या मुस्लिम लीग समवेत शामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालमध्ये एकत्र सरकार केले. 11 महिने मुखर्जी त्या सरकारमध्ये मंत्री होते. यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचे का?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमचे हिंदुत्व अत्यंत प्रखर आणि जाज्वल्य आहे. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला शिकवू नये, असा इशारा ठाकरेंनी दिला.

काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडले, असा अपप्रचार भाजप करीत आहे. त्याला ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले. अहो आम्ही तीस वर्ष भाजपबरोबर राहूनही आमची भाजप होऊ दिली नाही. आमची काँग्रेस कशी होईल? शिवसेना ही शिवसेनाच आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. तिचा शिवसैनिक प्रखर हिंदुत्ववादी आणि लढाऊ पाण्याचा आहे. तुमच्या प्रत्येक कारस्थानाला पुरून उरणारा आहे. हा शिवसैनिक माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. या शिवसेनेवर माझा अधिकार आहे आणि हे शिवसैनिक भाजप आणि गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरेंनी ठणकावले.

उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला उपस्थित त्यांनी टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांचा गजर करत कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ देत जनसंघाने संयुक्त महाराष्ट्र समितीत कशी फूट पाडली याची माहिती दिली. ते म्हणाले, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी सबंध मराठी माणूस रस्त्यावर उतरला. जसे ते स्वातंत्र्य चळवळीत नव्हते तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील जनसंघ नव्हता. लालबाग, परळ येथील कामगारांच्या घरात मोरारजीचे पोलीस अश्रुदुराच्या नळकांड्या फोडत होते. मात्र त्या मराठी माता तान्ह्या बाळांना घेऊन मोरारजींच्या पोलिसांसमोर जायच्या आणि हिंमत असेल तर आमच्यावर गोळ्या झाडा, असे आव्हान देत होत्या. आम्ही देखील कितीही दडपशाही केली तरी महाराष्ट्राच्या हितासाठी कणखरपणे हा लढा लढू, अशी गर्जना उद्ध ठाकरे यांनी यावेळी.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT