Nashik News : कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या साधूंना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तपोवनात साधूग्राम उभारण्यात येणार आहे. साधुग्रामच्या उभारणीकरता येथील जागा प्रशासनाला मोकळी करायची आहे. त्यासाठी तब्बल १८०० झाडे तोडली जाणार असल्याची भीती पर्यावरण प्रेमींना आहे. येथील झाडे तोडण्यात येणार असून महापालिकेने या झाडांवर फुली मारली आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही या वृक्षतोडीचे समर्थन केले आहे. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
पर्यावरण प्रेमींनी झाडे तोडण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. गिरीश महाजनांचाही निषेध पर्यावरणप्रेमींनी केला आहे. सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रमुख व अभिनेते सयाजी शिंदे यांनीही प्रशासनाच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत वृक्षतोडीला विरोध केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून सरकारवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, नाशिकचे तपोवन ही प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. पंरतु या परिसराचा विनाश करण्याचा प्रकार सरकार करत आहे. तपोवनात 60 हून अधिक प्रजातींची झाडे आहेत. त्यातील अनेक औषधी वनस्पती आहेत. परंतु कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली येथे ‘कत्तली’ होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनांचाही समाचार घेतला. म्हणाले, एक झाड कापलं तर दहा झाड लावणार असं गिरीश महाजन म्हणाले होते. मग ज्या जागेवर ही झाडे लावणार आहात त्याच जागेवर साधुग्राम का नाही करत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी भाजपच्या हिंदुत्वावर उद्धव ठाकरेंनी थेट प्रहार केला. भाजपचे हिंदुत्व हे थोतांड आहे. तिकडे जाऊन ‘राम राम’ करायचे आणि नाशिकमध्ये “मुँह में राम, बगल में अदानी” असे काम करायचे, अशा हिंदुत्वाला आम्ही मान्यता देत नाही. नाशिकमध्ये जे होतय ते हे हाणून पाडलेच पाहिजे. तपोवनासारखी पवित्र जागा कंत्राटी स्वार्थासाठी मारली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. “प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
साधुग्राम करण्यास आमचा विरोध नाही, पण तपोवनात साधुग्राम नको, कारण त्यासाठी हजारो साडे कापली जाणार आहे. त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. गेल्यावेळी जी जागा वापरली होती त्याच जागेत साधुग्राम का करत नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.