Uddhav Thackrey News: आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सगळीकडे सुरू आहे. राज्य शासनाकडून त्यासाठी महिलांचे मेळावे घेतले जात आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या या उपक्रमाची विशेष चर्चा आहे.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. तिचे जोरदार कोड कौतुकही केले जात आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्री ठीक ठिकाणी मेळावे घेत आहेत. याला धक्का बसणारी घटना नाशिक मध्ये घडली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शहरात महिलांचा मेळावा होत आहे. यावेळी लाडक्या बहिणी योजनेत राज्य शासनाच्या दीड हजार रुपये अनुदानासाठी अर्ज दाखल केलेल्या महिलाही सहभागी होणार आहेत.
यातील ५०० महिला भगिनींनी राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असतानाही प्रत्यक्षात मात्र शिवसेना नेते उद्धव ठाकरे हेच आमचे बंधू अशी घोषणा केली आहे. आमचा लाडका भाऊ फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे. आमचे मतदान फक्त मशाल चिन्हालाच अशी घोषणा असलेले फलक येथे तयार करण्यात आले आहे.
हे फलक चर्चेचा विषय ठरले आहे. या संदर्भात माजी नगरसेविका किरण गावणे यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे. या सर्व महिला भगिनी उद्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षालाच मतदान करणार अशी शपथ घेणार आहेत. त्यामुळे महायुतीला हा जोरदार धक्का मानला जातो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जन सन्मान यात्रेची सुरुवात नाशिक येथून केली होती. ही यात्रा म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारीच होती. या तयारीत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिवसभर लाडकी बहीण योजनेचे कोड कौतुक केले होते.
महायुतीचे मंत्री सध्या या याजनेचा अक्षरशः जप करीत आहेत. त्यानंतर नुकतीच जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी देखील लाडकी बहीण योजना किती प्रभावी आहे, यावर सर्व मंत्र्यांनी तोंड भरून कौतुक केले.
या मेळाव्यात महिलांनी या मंत्र्यांना राख्याही बांधल्या होत्या. या योजनेबाबत राज्यभर विविध मतप्रवाह आणि घोषणा होत आहेत. त्यामध्ये नुकतेच आमदार रवी राणा यांनी सरकारला पाठिंबा न दिल्यास महिलांकडून पंधराशे रुपये परत घेतले जातील, असा इशारा दिला होता.
आमदार राणा यांच्या या वक्तव्यावर मोठा वाद सुरू आहे. आता त्या सर्वांवर कडी करणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यक्रमात उद्या ५०० हून अधिक महिला उद्धव ठाकरे हेच आमचे बंधू, त्यांनाच करणार मतदान असा निर्धार करणार आहेत.
हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाशिकमध्ये यापूर्वीच निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यात आला आहे. नाशिक मध्य मतदार संघातून माजी आमदार वसंत गीते आणि नाशिक पश्चिम मतदारसंघ असून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना उमेदवार म्हणून ठराव करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या लोकप्रिय योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने केलेल्या राजकीय डावपेचांना शिवसेना ठाकरे गटाने महायुतीला चांगलीच धोबीपछाड दिली, असे म्हणता येईल.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.