NCP Protest News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : ...म्हणून मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांचे बॅनरवर छापले उलटे फोटो

कैलास शिंदे

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असतानाही केळी पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाच संतप्त झाला आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil),राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व मदत तसेच पुनर्वसनमंत्री अनिल पाटील आहेत. यामुळेच या तीनही मंत्र्यांचे फोटो बॅनरवर उलटे छापून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हटके आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. केळी पीकविम्यासाठी ते पात्र असतानाही त्यांना अद्यापही रक्कम मिळालेली नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील तीन मंत्री आहेत. परंतु,,तेसुद्धा काहीही करीत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केळी पीकविम्याची रक्कम त्वरित मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी शिंगाडे मोर्चा काढण्यात आला होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयापासून दुपारी दीड वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. माजी मंत्री अरुणभाई गुजराथी, डॉ. सतीश पाटील ,जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, किसान सेलचे सोपान पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे(Rohini Khadse) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

या वेळी मोर्चेकरांच्या हातात बॅनर होते. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व मदत तसेच पुनवर्सनमंत्री अनिल पाटील यांचे फोटो उलटे लावण्यात आले होते. या सरकारचे करायचे काय? असे त्यावर लिहिले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर दयावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री डॉ.सतीश पाटील म्हणाले, जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. परंतु, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाहीत.जिल्ह्यातील अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन मंत्रिपद आहे.

मात्र, ते सुध्दा शेतकऱ्यांना मदत देण्यास अकार्यक्षम ठरले आहेत.राज्यातील हे सरकारच शेतकरी विरोधी सरकार आहे.हे सरकार केवळ आमदार फोडण्यात व्यस्त आहे,त्यांना जनतेच्या प्रश्‍नाशी काहीही देणंघेण नाही असल्याची टीकाही त्यांनी केली.

किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील म्हणाले, जिल्ह्यातील तीनही मंत्री अकार्यक्षम ठरत आहेत. ते कोणतेही काम करीत नसल्यामुळे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यातही अकार्यक्षम ठरले असल्यामुळे त्यांचे फोटो आम्ही उलटे छापले आहेत. शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी अशी आमचीमागणी आहे. असे मतही त्यांनी व्यक्त केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT