Vaishali Suryawanshi joining BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vaishali Suryawanshi BJP : वैशाली सूर्यवंशींनी भाजपचा झेंडा हाती घेताच वारे बदलले, कुणाची अडचण होणार?

Vaishali Suryawanshi BJP : वैशाली सूर्यवंशींनी भाजपत प्रवेश केल्याने स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. याशिवाय भाजपमधील एक नेताही पेचात सापडल्याची चर्चा आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीनंतर पाचोरा मतदारसंघातील राजकारणात मोठ्या हालचाली झाल्या आहेत. पक्षांतरांची मालिका अजूनही सुरू असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सुटल्याने राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडे सर्वाधिक प्रवेश होत असताना, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी गट तसेच ‘उबाठा’मधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी भाजप व शिंदे गट मजबूत स्थितीत दिसत असून, काँग्रेस व राष्ट्रवादी गट मात्र थोडेसे ढिम्म अवस्थेत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, ‘उबाठा’च्या वैशाली सूर्यवंशी आणि भाजपचे अमोल शिंदे यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती. सुरुवातीला लढत काट्याची होईल, अशी अपेक्षा होती; मात्र अखेरीस मतदारांचा कल स्पष्टपणे आमदार किशोर पाटील यांच्या बाजूने झुकला. निवडणुकीनंतर राजकीय शत्रुत्वाची धार हळूहळू कमी होत चालली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी योग्य वेळ साधत मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी वैशाली सूर्यवंशी यांनी देखील शिवसेना ‘उबाठा’ला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे गिरीश महाजन यांचे जवळचे मानले जाणारे अमोल शिंदे मात्र राजकीय पेचात सापडल्याचे चित्र आहे. अमोल शिंदे यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आमदार किशोर पाटील यांनी आपली राजकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी कामकाजात गती आणली आहे. शहरासह तालुक्यातील विकासकामांना चालना देत ते सक्रिय झालेले दिसत आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजपाने जुन्या कार्यकारिणी बरखास्त करत नव्या चेहऱ्यांना संधी देत नवीन कार्यकारिणी गठित केल्या आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रभाग, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभागरचना व आरक्षणाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेनंतर काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. इच्छुकांच्या प्रभागांबरोबरच गट-गणांमध्येही हालचालींना वेग आला असून, दोन्ही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि काँग्रेस या पक्षांतर्फे संभाव्य उमेदवारांची तपासणी सुरू आहे.

प्रमुख नेतेमंडळींकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना शोधण्याचं काम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांची नेतेमंडळी शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यक्रमात जाणीवपूर्वक हजेरी लावताना दिसत आहेत. पालिकेचे 25 सदस्य, जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे 10 गण ही आकडेवारी जाहीर झाली आहे.

महायुतीमध्येही आजून युतीचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता वाढली आहे. अर्थात शिवसेनाही त्या तयारीत आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना सक्षम व प्रभावी नेतृत्वाची कमतरता भासत आहे. त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला प्रभाव सिद्ध करण्यासाठी मोठी दमछाक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT