Vishwajeet Kadam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vishwajeet Kadam News : विश्वजित कदमांना मोडायचाय स्वत:चाच 'हा' विक्रम; भर कार्यक्रमात केलं विधान, म्हणाले...

Assembly Elections : श्रीरामपुरात येण्यामागील तीन स्वार्थही सांगितले, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?

Pradeep Pendhare

महेश माळवे

Srirampur News : ''विधानसभेत बिनविरोध निवडून जाणारा मी पहिला आमदार होतो, तर दुसऱ्या वेळेस एक लाख 63 हजार मताने निवडून येण्याचा विक्रमही आपल्याच नावावर आहे. हा विक्रम आता आपल्याला मोडायचा असून, यासाठी सर्व ज्येष्ठांचे मार्गदर्शन व आशीर्वाद सोबत आहेत,'' असे विधान माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी श्रीरामपूर येथे एका कार्यक्रमात केले.

श्रीरामपूरच्या रयत संकुलाच्या बोरावके महाविद्यालयात आयोजित नोकरी महोत्सवाच्या उदघाटनात ते बोलत होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे बांधकाम विभागाचे अध्यक्ष प्रकाश निकम, माजी आमदार भानुदास मुरकुटे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विश्वजित कदम(Vishwajeet Kadam) म्हणाले, "श्रीरामपुरात येण्यामागे आपले तीन स्वार्थ होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲड. रावसाहेब शिंदे, दिवंगत माजी आमदार जयंत ससाणे व रयत संकुलाला नेहमीच भेट देणारे माझे वडील दिवंगत पतंगराव कदम(Patangrao Kadam) यांच्या सर्व आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला असून, त्यांच्या स्मृतीला या निमित्ताने अभिवादन करता आले."

तसेच, ''करण ससाणे व हेमंत ओगले माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. ते सध्या एकत्रितपणे राम-लक्ष्मणप्रमाणे काम करतात. त्यांना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शन आहे. मुरकुटे यांचा दिनक्रम बघता ते ८२ वर्षांचे आहेत, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना आता युवक काँग्रेसमध्ये घ्यावे लागते की काय, अशी मिश्किल टिप्पणी करत कदाचित ८० वर्षांहून अधिक काळ आयुष्य मिळालेली तुमची शेवटची पिढी असेल, आमच्या पिढीची काही खरे नाही,'' असे त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

याचबरोबर ''जयंत ससाणे यांच्या विचारांचा वारसा करण पुढे चालवीत आहेत. त्यांच्यात जयंत ससाणे यांची छबी दिसते. जयंत ससाणे व पतंगराव कदम यांचे मैत्रीचे संबंध संपूर्ण राज्याला माहीत होते. जयंत ससाणे यांच्याकडे आक्रमकपणाबरोबरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांची समज होती. मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न ते पतंगराव कदमांकडे घेऊन येत. त्यामुळे करण ससाणे यांच्या पाठीशी हा विश्वजित कदम आयुष्यभर उभा आहे, हे सांगताना मला कोणाचीही भीती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच ओगले यांनी युवक काँगेसच्या माध्यमातून इतके काम देशभर केले आहे, की ते कोणत्या राज्यात गेले तरी त्यांच्या स्वागताला एखाद्या आमदाराला यावे लागते, असेही आमदार कदम यांनी या वेळी बोलून दाखवले .

... तेव्हा पतंगरावांनी तब्बल ३२ वेळा मुलाखत दिली होती -

वडील पतंगराव कदम हे 'रयत'चे माजी विद्यार्थी होते. कमवा आणि शिकवा योजनेतून त्यांनी शिक्षण घेतले. नोकरी मिळविण्यासाठीही त्यांनी मोठा संघर्ष केला. पुण्यातील एका संस्थेत दहा वेळेस नव्हे तर ३२ वेळा त्यांनी मुलाखत दिली होती. शेवटी तेथील प्राचार्यांनी त्यांना नोकरी दिली.

त्यामुळे एक दोन मुलाखतीतून नोकरी नाही मिळाली, तरी विद्यार्थ्यांनी निराश न होता मुलाखती द्याव्यात, यश नक्कीच मिळते, असा सल्लाही या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आमदार विश्वजित कदम यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT