Nagar : कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीसाठी भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी महायुती सरकारच्या पाठबळावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर कुरघोडी केली. कर्जत येथे एमआयडीसीसाठी आमदार शिंदे यांनी नाशिक एमआयडीसी विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्यासह तालुका प्रशासनातील सर्व विभागप्रमुख आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक घेतली.
"सर्वांच्या हिताची एमआयडीसी उभारणार असून यासाठी सर्व नियम, निकष पूर्ण करणारी जागा संपादित करण्यात येईल. औद्योगिक विभागाच्या निकष आणि नियमानुसार कर्जत तालुक्यातील 6 ठिकाणची माहिती संकलित करण्यात आली असून सर्वाना विश्वासात घेत सबंधित अधिकारी आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करतील. सरकारने 15 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, आदेश निघाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अधिकारी कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी प्रयत्न करीत आहे. एमआयडीसी जागेचा प्रस्ताव ओपन फॉर ऑल असून जागा कोणत्याही भागातील असू शकते", असे राम शिंदे म्हणाले.
औद्योगिक विभागाच्या निकष आणि नियमानुसार एमआयडीसीसाठी जागा समतल असावी. त्यालगत राष्ट्रीय महामार्ग, पाण्याची सोय, विजेची सोय आणि विशेष म्हणजे जागा सलग असणे आवश्यक आहे. ती संपादित करताना सर्वसामान्य नागरिकांना विचारात घेत जागा ठरविण्यात येईल, अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
वास्तविक पाहता पूर्वीची मौजे पाटेवाडी-खंडाळा भागातील जागा सदोष होती. त्या ठिकाणी वनविभाग, इको सेन्सेटिव्ह झोनचा प्रश्न उपस्थित झाला होता. यासह लगतच्या ग्रामस्थांनी जागा देण्यासाठी विरोध केला. बागायती जमीन येऊ नये, असा ठराव झाला. त्यामुळे तुकड्या-तुकड्याची एमआयडीसी होणे शक्य नाही. तसेच ईडी कारवाई झालेली नीरव मोदींची जमीन प्रस्तावित आराखड्यात असल्याने तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. आणि तातडीने नवीन जागेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिले. त्यानुसार रविवारी संबंधित विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाची बैठक घेण्यात आली.
मिशन मोडवर यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशा सूचना आमदार शिंदे यांनी बैठकीत दिल्या. कोंभळी-रमजान चिंचोली, वालवड-सुपे, पठारवाडी, कुंभेफळ- अलसुंदे- कोर्टी, देऊळवाडी आणि थेरगाव या सहा जागेची पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मागणी केली. याशिवाय आणखी महत्वाची ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास त्याचा विचार देखील करावा, अशी मागणी बैठकीत पुढे आली.
मौजे पाटेवाडी भागात पुण्याच्या गुंतवणूकदाराची जमिनी असल्याचे प्रथम दर्शनी आढळून येत आहे. त्यामुळे आपण उघड सांगितले आहे. कोणी जागा सुचवा आणि कुठलेही जागा संपादित करा. मतदारसंघातील युवकांसाठी एमआयडीसी व्हावी अशी प्रामाणिक भावना आहे. मात्र, गुंतवणूकदार आणि दलालांनी घेतलेल्या जागेत ती होऊ नये, अशी अपेक्षा आहे. ज्याची जागा एमआयडीसीसाठी संपादीत होईल त्या शेतकऱ्याला त्याचा थेट लाभ व्हावा, अशी आपली ठाम भूमिका असल्याचे आमदार राम शिंदे यांनी बैठकीत म्हटले.
निकष पूर्ण करणारी जमीन आवश्यक
कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी औद्योगिक विभागाच्या नियम आणि निकषांनुसार भूसंपादित करणारी जागा समतल आणि सलग क्षेत्र असणारी हवी. तसेच त्या जागेला लागून राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक कंपन्यांसाठी वीज, पाणी आणि इतर भौतिक सुखसुविधा संपन्न असणारी ठिकाण सुचवावे. भू संपादन झालेल्या संबंधित जमीन मालकास शासन रेडी रेकनर दराच्या चार पट मोबदला आणि त्याच्या जागेच्या १०% विकसित भूखंड निशुल्क दराने व्यवसायासाठी देत असल्याचे बैठकीत विशष केले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.