Devendra Fadnavis assures Vivek Kolhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Candidate List: विधानसभेला माघार, फडणवीसांची मध्यस्थी, दिल्लीत शहांची हमी; 'असं' खेचून आणलं कोपरगावच्या विवेक कोल्हेंनी विधान परिषदेचं तिकीट

BJP News: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातलं मोठं प्रस्थ मानलं जाणाऱ्या आणि कोपरगाव मतदारसंघावर तीन-साडेतीन दशकं वर्चस्व ठेवणाऱ्या कोल्हे कुटुंबाला विधानसभा निवडणुकीत माघार घ्यावी लागली होती.

Deepak Kulkarni

Pune News: भाजपनं मंगळवारी (ता.28) विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात विद्यमान आमदारांपैकी एकालाही संधी देण्यात आले नसल्याचं समोर येत आहे. पण काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. तसेच भाजपच्या यादीत विवेक कोल्हे ,संजय भेंडे, माधवी नाईक, प्रमोद जठार,सुनील कर्जतकर असे नव्या चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यात विवेक कोल्हेंच्या नावाचाही समावेश आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातलं मोठं प्रस्थ मानलं जाणाऱ्या आणि कोपरगाव मतदारसंघावर गेली चार दशकं वर्चस्व ठेवणाऱ्या कोल्हे कुटुंबाला विधानसभा निवडणुकीत माघार घ्यावी लागली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अन् आताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यावेळी शिष्टाई यशस्वी ठरली होती.विवेक कोल्हे यांनी माघार घेताच,फडणवीस यांनी कौतुकही केलं होतं.

महायुतीत विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारालाच तिकीट देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. या निर्णयाचा अनेक भाजपच्या प्रबळ दावेदार इच्छुक उमेदवारांना मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यात कोपरगावच्या विवेक कोल्हेंचाही समावेश होता. कारण याठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आशुतोष काळे यांना पुन्हा एकदा विधानसभेची संधी मिळाली होती.खरंतर कोल्हे-काळे हे एकमेकांचे गेली कित्येक दशकं पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत.

पण आपली ताकद असूनही युतीधर्म म्हणून विवेक कोल्हेंवर विधानसभेला माघार घेण्याची वेळ आली होती. यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिल्लीत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर, विवेक कोल्हे यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयामागे भाजपची अजित पवार गटाशी असलेली युती हे प्रमुख कारण मानले जात होते.

विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यास त्यांना राज्यसभेची उमेदवारी किंवा इतर मोठे राजकीय पद देण्याचे आश्वासन भाजपकडून कोल्हेंना देण्यात आल्याची चर्चा होती. 2026 च्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून विवेक कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केली होती.

कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर विधानपरिषदेचे तिकीट फिक्स मानले गेले.यामुळे यादी जाहीर होण्यापूर्वीचकोल्हे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाची हमी दिली होती,ज्याची पूर्तता आता होताना दिसत आहे

विवेक कोल्हेंना प्रचंड मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे या कोपरगावच्या माजी आमदार राहिल्या आहेत. तर विवेक कोल्हेंचे आजोबा शंकरराव कोल्हे हे कोपरगावचे सरपंच आणि त्याच तालुक्याचे सहावेळा आमदार राहिले होते. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सुरुवातीच्या काळापासून काम केले.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं सहकारातील योगदान अतिशय मोठं राहिलं. 1960 मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या.शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

शंकरराव कोल्हे यांनी महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. बी.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चरची पदवी संपादन केलेले कोल्हे यांचे शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण अशा विविध क्षेत्रात मोठे काम केले. राजकारणाचं बाळकडू लहान वयापासूनच मिळालेल्या विवेक कोल्हेंसारखा एकदम ताज्याम दमाचा नवा चेहरा विधान परिषदेसाठी भाजपनं देताना भविष्याचा विचार केलेला आहे. विवेक कोल्हे यांनी अगदी कमी वयात कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणावरही मोठी छाप पाडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT