

Solapur, 28 April : सोलापूर शहर आणि जिल्हा भाजपमय झालेला असताना पक्षातील मतभेद मात्र कायम आहेत. मागील टर्ममध्ये एकमेकांचे विरोधक असलेले दोन्ही देशमुख सध्या एकत्र आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी दोन्ही देशमुखांचे मतभेद असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. आज सोलापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित दौऱ्यात नसतानाही अचानकपणे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी भेट दिली, यावेळी देशमुख पिता-पुत्रांसमवेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद दाराआड चर्चा केली आहे, त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ऐतिहासिक यशाबद्दल नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी बार्शीहून आलेल्या फडणवीस यांंना दौऱ्यात समावेश नसतानाही माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे घर गाठले.
सुभाष देशमुख यांच्या घरी जाताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही सोबत होते. मात्र, देशमुख आणि मुख्यमंत्र्यांसमवेतच्या चर्चेत ते सहभागी झाले होते की नाही, याची माहिती मिळू शकलेली नाही.
आमदार देशमुख यांनी आपल्या सामाजिक माध्यमावरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीची माहिती दिली आहे. या वेळी सुभाष देशमुख यांच्या सौभाग्यवती स्मिता देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे औक्षण करून स्वागत केले. या वेळी माजी मंत्री देशमुख यांचे दोन्ही पुत्र रोहन आणि मनीष हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत माजी मंत्री सुभाष देशमुख, त्यांचे पुत्र रोहन आणि मनीष यांनी बंद दाराआड चर्चा केली. फडणवीस यांच्यासोबत विविध स्थानिक विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित दौऱ्यात माजी मंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी भेटीचा कार्यक्रम नव्हता. त्यानंतरही फडणवीस यांनी हेलिकॉप्टरने बार्शीहून आल्यानंतर थेट देशमुख यांचे घर गाठले. त्यामुळे या भेटीचे महत्व वाढले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुख यांची अचानक भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे, त्यामुळे सोलापूर दौऱ्यातील या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसेच, या भेटीच्या अनुषंगाने कोण कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.