Ganesh Sugar Factory Election
Ganesh Sugar Factory Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ganesh Sugar Factory Election: '' विखेंना जे दहा वर्षात जमलं नाही, ते पाच वर्षात काय जमणार? ''; थोरातांचा हल्लाबोल

रश्मी पुराणिक

Ahmednagar : गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. आजी-माजी महसूलमंत्र्यांसह राष्ट्रवादी व भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या भूमिकेमुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्याला विखे-थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य नवीन नाही, मात्र, गणेश कारखान्याच्या निमित्ताने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रथमच आमने-सामने येत आहेत.

शिवाय राष्ट्रवादीचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे व त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी कोल्हे यांचे नातू तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या भूमिकाही महत्वपूर्ण ठरणार आहेत. यामुळे ‘गणेश’चं राजकारण चांगलंच तापलं आहे.याचवेळी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर भाष्य करतानाच कट्टर राजकीय वैरी असलेल्या भाजप नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलां(Radhakrishna Vikhe Patil)वरही टीकेची झोड उठवली आहे. थोरात म्हणाले, गणेश सहकारी साखर कारखाना आसवणी प्रकल्पासह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास पाच वर्षांसाठी भागीदारी तत्त्वावर चालविण्यास देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पण यासंदर्भातील घटनाक्रम अत्यंत संशयास्पद आहे. ३० मे रोजी साखर आयुक्तांकडून बैठकीची सूचना आणि लगेच त्याचदिवशी बैठक आणि तातडीने गणेश कारखाना भाडेकरारानं देण्याचा निर्णय घेणं हे नेमकं कोणाच्या दबावातून हे सर्व केले जात आहे, याची जाणीव जनतेला आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे असा घणाघात थोरातांनी केला आहे.

विखेंना जे दहा वर्षात जमलं नाही, ते पाच वर्षात काय जमणार?

संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना, साखर आयुक्तांकडे तातडीची बैठक घेऊन श्री गणेश सहकारी साखर कारखाना(Ganesh Sugar Factory Election) हा विखे पाटील कारखान्याला पाच वर्षे करारानं चालवायला देणं हा शेतकरी, सभासद आणि कामगारांशी विश्वासघात आहे. यापूर्वी दहा वर्ष गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पाटील यांच्या ताब्यात होता.

त्याच काळात गणेश कारखाना संकटात सापडला. त्यांना दहा वर्षात जे जमले नाही ते पाच वर्षात काय जमणार? मुळात हा करार कारखाना चालवण्यासाठी नाही तर कारखाना कायमचा बंद करण्यासाठी केलेला आहे, सत्तेचा हा गैरवापर गणेश परिसरातील सभासद व शेतकरी सहन करणार नाही असा इशारा थोरात यांनी दिला आहे.

...म्हणून मी कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातलं!

बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) म्हणाले, ‘निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना गणेश सहकारी साखर कारखान्याचे खरे मालक असलेल्या सभासद आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन हा भाडेकरार होतो आहे. हा करार बेकायदेशीर आहे. न्यायालय आणि सभासद शेतकऱ्यांच्या दरबारातही तो टिकणार नाही. हा सत्तेचा हा गैरवापर असून सभासद आणि शेतकरी सहन करणार नाही. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या हितासाठी, सभासद व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी मी कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातलं आहे.

कारखान्याच्या परिसरात विकासाची ही कामधेनु जिवंत राहण्यासाठी ही लढाई आम्ही लढत आहोत. त्यांचा हेतू जरी गणेश बंद करणे असा असला तरी, गणेशचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि ही संस्था चालवण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असल्याची भूमिका थोरात यांनी स्पष्ट केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT