Anil Patil, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Photo : काहीही झाले तरी शरद पवारांचा फोटो लावणारच; अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं

कैलास शिंदे

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आमच्यासाठी दैवत आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा फोटो आम्ही लावणार आहोत, त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे प्रतोद व राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटलांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाच्या या भूमिकेमुळे शरद पवार काय पाऊल उचलणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

जळगाव जिल्हा बँकेत गुरुवारी संचालकाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री अनिल पाटील संचालक म्हणून उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी आपला फोटो लावू नये, लावल्यास आपण गुन्हा दाखल करणार, असा इशारा अजित पवार गटाला दिला आहे. याबाबत छेडले असता पाटील म्हणाले, "शरद पवार आम्हाला पूजनिय आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो आम्ही लावणार आहोत. तसेच कायद्यात अशी काही तरतूद दिसत नाही. कोणाचा फोटो लावला म्हणून कारवाई झाली, असे कुठेही झाले नाही."

"प्रभूश्रीरामाचा फोटो आस्तिक असतील तेही लावतात नास्तिक असतील तेही लावतात. त्यामुळे नास्तीक व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असे आजपर्यंत झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले असताना पवार व मोदींचे एकाच बॅनरवर फोटो होते. मग कोणी कोणावर केस दाखल करायची होती ? फोटो लावण्यास त्यांनी विरोध करणे हे मनाला पटणारे नाही. आम्ही त्यांचा फोटो लावणार आहोत. त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावेत," असे स्पष्टपणे पाटलांनी सांगितले.

स्वागताचे बॅनरही लावणार

शरद पवार ४ सप्टेबर रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदारपणे सुरू आहे. त्याबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, "शरद पवार जळगाव दौऱ्यावर आल्यास त्यांच्या स्वागताचे फोटो आम्हीही लावणार आहोत." खुद्द पवारांनी अनेकदा इशारा देऊनही अजित पवार गटाकडून त्यांचे फोटो वापरणे बंद केले जात नाही. परिणामी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT