नाशिक : मंगळवारी रात्री वासननगर येथील शिवसेनाप्रणित (Shivsena) सह्याद्री युवक मंडळ आणि शिवमुद्रा फाउंडेशनच्या दांडिया मैदानात आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांची एन्ट्री झाल्याने काही काळ संयोजकदेखील गडबडून गेले होते. विशेष म्हणजे या वेळी आमदार हिरे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) हेदेखील व्यासपीठावर होते. त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला. (Shivsena city president Sudhakar Badgujar welcomes BJP MLA Hiray)
संयोजक तथा माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी अखेर समयसूचकता दाखवत बडगुजर यांच्या हस्तेच आमदार हिरे यांचे स्वागत करून वातावरण हलकेफुलके केले.
शेवटचा दिवस असल्याने येथे अफाट गर्दी झाली होती. श्री. जाधव हे बडगुजर यांचे स्वागत करताना यापुढे या भागात जर मोठे प्रकल्प आणायचे असतील तर आमदार म्हणून बडगुजर यांच्यासारखे नेतृत्व सर्वांनी पुढे आणण्यासाठी चंग बांधला पाहिजे, असे आवाहन केले. नेमक्या त्याच वेळी आमदार हिरे यांचे येथे आगमन झाले. शिवसेनेच्या स्टेजवर भाजपच्या आमदार आल्याने उपस्थित हजारो दांडियाप्रेमीदेखील काही क्षण अवाक झाले. आमदार हिरे आणि जाधव हे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे जाधव यांचे चिरंजीव अमेय यांनी आमदार हिरे यांना विशेष आमंत्रण दिले होते. मतदारसंघातील कार्यक्रम आणि मिळालेल्या आमंत्रणाचा मान ठेवून हिरे येथे आल्या खऱ्या, मात्र सर्वांचीच काही क्षण गोची झाली.
पोलिसदेखील सतर्क झाले. अखेर आपला राजकारणातला अनुभव पणाला लावून श्री. जाधव यांनी माईकचा ताबा घेत आमदार हिरे यांनीच आता त्यांच्यासह बडगुजर यांच्याही आमदारकीबाबत काही तरी करावे, असे आवाहन केले आणि वातावरण हलके केले. बडगुजर यांनाच मग त्यांनी आमदार हिरे यांचे स्वागत करण्यास सांगितले. त्यांनीदेखील हसत मुखाने स्वागत करत आनंदात भर टाकली. त्याला उपस्थितांनीदेखील टाळ्या वाजवत मोठी दाद दिली, तर आमदार हिरे यांनीदेखील नागरिकांच्या आनंदासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाचे मोठ्या मनाने कौतुक केल्याने त्यांनादेखील उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्यांची दाद दिली.
दांडिया निमित्त महायुती
हे सगळे होत असताना उत्कृष्ट सादरीकरणासाठी बक्षीस मिळवणाऱ्यात शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या सूनबाईंचा समावेश असल्याचे समोर आल्याने दांडिया निमित्त का असेना शिवसेना, भाजप आणि शिंदे गट अशी महायुती झाली आहे. अशी मिस्कील प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. हे सर्व सुरू असताना मोठ्या तणावात आलेले इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे आणि सहकारी पोलिस तणावमुक्त झाले.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.