Prajakt Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure : 2000 हजार कोटींचा फंड कुठेय? विधानसभा अध्यक्षांनी घंटी वाजवताच आमदार तनपुरे कडाडले

Nagpur Winter Session News : " जलजीवनचे सर्व्हे चुकीचे..."

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे हे आज एकटेच महायुती सरकारला सभागृहात भिडले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राखून ठेवलेल्या सुमारे २००० हजार कोटी रुपयांचा अॅग्रीकल्चर कांटेजन्सी फंड (एसीएप) बंद केल्यावरून आमदार तनपुरे महायुती सरकारवर चांगलेच कडाडले.

आमदार तनपुरे बोलत असतानाच अध्यक्षकांनी घंटी वाजवली. "मी आमच्या पक्षाकडून सभागृहात एकटाच आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही गंभीर विजेच्या प्रश्नावर घंटी वाजवत आहात. मी काही गंभीर सांगतो आहे, तुमचे लक्ष नाही. तुम्ही लक्ष द्या", अशा कडक शब्दात आमदार तनपुरे यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधून घेतले.

नागपूर हिवाळी अधिवेशनात अवकाळी, गारपीट, पिक विमा मिळत नसल्याचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सत्ताधार्यांविरोधात आक्रमक आहेत. नागपूर अधिवेशनाचा आज कामकाजाचा चौथा दिवस होता. या दिवशी शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार गटाचे नेते नागपूरमध्ये तळ ठोवून होते. आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा देखील नागपूरमध्ये धडकली आहे. यात्रेनंतर आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नागपूरमधील राजकीय वातावरण यामुळे चांगलेच तापले आहे. यावरून नागपूरमधील या राजकीय संघर्षाचे पडसाद राज्यात उमटू लागलेत.यातच शरद पवार गटाचे नेते माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी राखून ठेवलेला अग्रीकल्चर कांटेजन्सी फंड (एसीएफ) बंद केल्याचा मोठा मुद्दा सभागृहात उपस्थित करून महायुती सरकारची चांगलीच कोंडी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांवरील चर्चेत महावितरण आणि जलजीवन मिशन संदर्भातील विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले. प्राजक्त तनपुरे म्हणाले, "ऊर्जा विभागाची ही बाब असून, कृषी पंप आणि वस्त्रो उद्योजकांशी निगडीत विषय आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अॅग्रीकल्चर कांटेजन्सी फंड उभा केला होता. या फंड शेतकऱ्यांना विजेच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होता.

या फंडाच्या माध्यमातून उपकेंद्राची निर्मिती झाली. उपकेंद्राची क्षमता वाढवली गेली. रोहित्रांची दुरुस्तीबरोबर नवीन रोहित्र उभारली गेली. काही रोहित्रांची क्षमता वाढवली गेली. या फंडामध्ये 2000 हजार कोटी रुपये शिल्लक होते. महाविकास आघाडी सरकार असेपर्यंत हा फंड सुरू होता. परंतु महायुती सरकारने काय गणित बसवले आणि हा फंड बंद केला आहे". हा फंड चालू करावा यासाठी गेल्या अधिवेशनापासून पाठपुरावा सुरू आहे. या फंडामध्ये असलेले 2000 हजार कोटी तरी शेतकऱ्यांसाठी द्या, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.(Winter Session)

दिवसा वीज देण्याच्या घोषणा

राज्यातील शेतकऱ्याला राज्यात दिवसा वीज मिळावी. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत अनेक प्रकल्प राज्यात राबवले जाणार आहोत. ग्रामपंचायतींकडून जागा घेतली जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात राबवलेले सौर ऊर्जावरील प्रकल्प महायुती सरकारकडून अर्धवट ठेवली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची नुसत्या घोषणा महायुती सरकार करते आहे. नुसते भाषण करतात. याबाबत सरकार गंभीर नाही. घोषणा करतात. ही योजना खूपच स्लो आहे. महायुती सरकारने दोन ते तीन हजार रुपये द्यावेत. यासाठी सरकारने आपल्या जाहिरातीवर खर्च कमी करावा, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

जलजीवनचे सर्व्हे चुकीचे...

राज्यात जलजीवन योजनेअंतर्गत गावोगावी सर्व्हे सुरू आहेत. परंतु हे सर्व्हे चुकीची झाले आहेत. अनेक वाड्या-वस्त्यांना वगळले आहे. त्यामुळे हे सर्व्हे पुन्हा करावीत, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. दुष्काळदृश्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल, अशी भूमिका सरकारने घ्यावी. तसेच दुधाला भाव मिळावा यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा. पीक विम्याची अग्रामी रक्कम सर्व शेतकर्यांना मिळावी अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT