Kopargaon Mahayuti Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dispute In Mahayuti : खासदार लोखंडे कोण? आमदार काळेंच्या कार्यकर्त्याच्या प्रश्नावरून गोंधळ

Lok Sabha Election 2024 : मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार आशुतोष काळे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम... जय श्रीराम.., अशी घोषणाबाजी केली.

Pradeep Pendhare

Nagar, 3 May : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यकर्त्याने खासदार सदाशिव लोखंडे कोण? याची माहिती करून द्या, अशी विचारणा महायुतीच्या भरबैठकीत केली. कोपरगाव नगरपालिकेतील अपक्ष माजी नगरसेवक मेहबूब सय्यद यांनी हा प्रश्न केल्याने बैठकीत गोंधळ झाला. माजी नगरसेवक मेहबूब सय्यद यांच्या या प्रश्नामुळे उमेदवार खासदार लोखंडे यांची चांगलीच अडचण झाली. भाजपचे स्टार प्रचारक तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित हा प्रकार घडला.

महायुतीमधील (Mahayuti) शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचे कोपरगावमध्ये उद्‌घाटन होते. यानिमित्ताने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. मंत्री विखे यांच्यासह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आशुतोष काळे, उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे, नितीन औताडे या वेळी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठक सुरू होताच अपक्ष माजी नगरसेवक मेहबूब सय्यद यांनी उभे राहून खासदार सदाशिव लोखंडे (Sadhashiv Lokhande) कोण, याची माहिती करून द्या, अशी मागणी केली. यावर काही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मेहबूब सय्यद यांना सुनावत खाली बसा. सर्व उत्तरे मिळतील. बैठकीत अशी भाषा वापरू नका, असे सांगितले. मेहबूब सय्यद जागेवरच उभे होते. पालकमंत्री विखे यांनीही माईक हातात घेऊन मेहबूब सय्यद यांना खाली बसण्याची सूचना केली.

बैठकीनंतर महायुतीचे पदाधिकारी मेहबूब सय्यद यांच्याविरोधात आक्रमक झाले. मंत्री विखे आणि आमदार काळे बैठकीतून बाहेर पडत असताना कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महायुतीच्या कार्यकर्ते आणि मेहबूब सय्यद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम... जय श्रीराम.., अशी घोषणाबाजी केली. त्यावर पोलिसांनी मेहबूब सय्यद यांना गोंधळातून बाजूला केले.

नितीन औताडे यांनी मेहबूब सय्यद यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. 'विरोधकांनी काही भाड्याचे लोक आमच्या बैठकीत पाठवले. गोंधळ घातला. मेहबूब सय्यद ही व्यक्ती कोपरगावातील अनेक पक्ष फिरला आहे, असे सांगून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबरोबरचे फोटो दाखवून आमच्या बैठकीत गोंधळासाठी त्याला विरोधकांनी पाठवले आहे', असा आरोप औताडे यांनी केला.

'पालकमंत्री विखे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यासाठी आला होता. हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी खडसावले. मेहबूब सय्यद दररोज पक्ष बदलणारा व्यक्ती आहे. त्याला किंमत नाही, आमच्या कार्यक्रमात पैसे घेऊन गोंधळ घालायला आला होता', असा गंभीर औताडे यांनी केला.

दरम्यान, मेहबूब सय्यद यांनीही यावर सुनावले आहे. 'मी माजी नगरसेवक आहे. यांनी बोलावले म्हणून आम्ही येथे आलो. या बैठकीला आम्हाला आमचे नेते आमदार आशुतोष काळेंनी (MLA Ashutosh Kale) बोलावले म्हणून आलो. या बैठकीला सर्व जाती-धर्माचे पदाधिकारी होते. खासदार लोखंडे यांचा परिचय मागितला. यात काय चूक केली. चुकीचे असेल, तर बुटाने मारा', अशा शब्दात मेहबूब सय्यद यांनी सुनावले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT